करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शाळादेखील बंद आहेत. लॉकडाउन संपल्यानंतरही शाळा लगेच सुरु केल्या जाणार का याबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश निशांक यांनी शिक्षकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी शाळा जेव्हा नव्याने सुरु होतील तेव्हा आसन व्यवस्था, वेळेत बदल याशिवाय अनेक महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात असं सांगितलं आहे.

नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCERT) शाळा नव्याने सुरु होतील तेव्हा नवीन कार्यपद्धती आणण्याचा विचार करत आहे. तर युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनदेखील (UGC) उच्च शिक्षण संस्था, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये बदल करणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

आणखी वाचा- असा असू शकतो लॉकडाउन ४.०, रेड झोनमध्येही दिलासा मिळण्याचे संकेत

युजीसीने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्टमध्ये वर्ग सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र शाळा कधी सुरु होणार आहेत याबद्दल अद्याप कोणतीच स्पष्टता नाही. “विद्यार्थ्यांचं आरोग्य आमची मुख्य काळजी आहे. जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत,” असं रमेश निशांक यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना करोनाशी लढण्यासाठी तसंच प्रत्येक माहिती मिळवण्यासाठी करोना अॅप डाउनलोड करा अशी सूचना दिली.

लॉकडाउनमुळे मार्च महिन्यापासून शाळा-कॉलेज बंद आहेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणी घेण्यास सांगण्यात आलं आहे. रमेश निशांक यांनी यावेळी शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करण्यास सांगितलं आहे. डिजिटील लर्निंगवर भर दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. “या परिस्थितीकडे आपण संधी म्हणून पाहिलं पाहिजे आणि डिजिटल सुविधा मजबूत करण्यावर लक्ष दिलं पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं.