लस हाच करोना व्हायरसला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे करोना व्हायरसवर परिणामकारक ठरणारी लस विकसित करण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. काही देशांमध्ये करोनाला रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. जर्मनीमध्ये माणसांवर लसीच्या क्लिनिकला चाचण्या घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. युनायटेड किंगडममध्ये आजपासून लसीची मानवी चाचणी सुरु होईल. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

करोना संदर्भात जगभरात १५० प्रकल्पांवर काम सुरु आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात स्वयंसेवकांना गुरुवारी या लसचा पहिला डोस देण्यात येईल. चिंपांझीमध्ये सापडलेल्या व्हायरसच्या आधारावर ही लस विकसित करण्यात आली आहे. जर्मनीने सुद्धा लस विकसित केली आहे. जर्मनीतील बायॉनटेक आणि पिफायझर या अमेरिकन कंपनीने मिळून करोना व्हायरसला रोखणारी एक लस विकसित केली आहे.

या लसीच्या मानवी चाचण्या घेण्यास पीईआय या जर्मन नियामक यंत्रणेने मंजुरी दिली आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील पहिल्या टप्प्याच्या चाचणीमध्ये १८ ते ५५ वयोगटातील एकूण ५१० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. खास करोनासाठी विकसित करण्यात आलेली ही लस ८० टक्के यशस्वी ठरेल असा प्राध्यापक सारा गिलबर्ट यांचा अंदाज आहे. त्या प्रोजेक्टच्या रिसर्च संचालक आहेत. सप्टेंबरपर्यंत लाखो लसीची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. जेणेकरुन लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचेल.

स्रायललाही महत्वपूर्ण यश
लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. “आमच्या प्रयोगशाळेमध्ये करोना विषाणूच्या कुटुंबावर काम सुरु आहे. लस बनवण्याच्या दृष्टीने दोन-तृतीयांश काम पूर्ण झालं आहे” असा दावा जोनाथन गेरशोनी यांनी केला आहे. ते तेल अविव विद्यापीठातील मॉलीक्युलर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी विभागाचे प्राध्यापक आहेत. ‘करोनावरील लस निर्मितीला आणखी वर्षभराचा कालावधी जाईल’ असे त्यांनी सांगितले.

जोनाथन गेरशोनी मागच्या १५ वर्षांपासून विषाणूंचा अभ्यास करत आहेत. करोना विषाणूमधील रिसेप्टर बाइंडिंग मोतीफ (RBM) या घटकाला लक्ष्य करणारी लस बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. RBM हा व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमधील छोटासा भाग आहे. पेशींमध्ये घुसखोरी करण्यासाठी व्हायरस वेगवेगळया प्रोटीन्सचा वापर करतो.