एका ७१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांनी करोना चाचणीच्या अहवालाची वाट बघत दोन दिवस घरातच ठेवल्याची एक घटना कोलकाता शहरात घडली आहे. मृत व्यक्तीला ताप आला होता. त्यानंतर या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. मात्र, रिपोर्ट येण्याआधीच व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार न करता रिपोर्ट येईपर्यंत दोन दिवस त्यांचा मृतदेह घरातील एका रुममध्येच ठेवला.

उत्तर कोलकातामध्ये कुटुंबीयासोबत राहत असलेल्या ७१ वर्षाच्या व्यक्तीला शनिवारी ताप आला. त्यानंतर करोनाच्या संशयामुळे रविवारी या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हिंदुस्थान टाईम्सनं याविषयीचं वृत्त दिलं आहे. “माझ्या काकांना शनिवारी ताप आला होता. त्यानंतर खासगी डॉक्टरच्या सल्ल्यानंतर सोमवारी त्यांचा स्वॅब एका खासगी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. पण, अचानक त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला,” अशी माहिती मृत व्यक्तीच्या पुतण्यानं दिली.

मृत्यु झाल्यानंतर कुटुंबीयांनी कोलकाता पोलीस, आरोग्य विभाग व महापालिका कर्मचाऱ्यांशी संपर्क केला. मृत व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल येईपर्यंत पार्थिव शवागारात ठेवण्यात यावं यासंदर्भात त्यांनी प्रशासनाकडे प्रयत्न केले. मात्र, तीन शवागारांनी त्यांनी मृतदेह ठेवण्यास नकार दिला. त्यांच्याकडे करोना रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी तशा पद्धतीची सुविधा नसल्याचं या शवागारांनी त्यांना सांगितलं.

त्यामुळे या कुटुंबानं नंतर करोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत घरातील एका खोलीतच मृतदेह ठेवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री मृतदेह एका खोलीत ठेवण्यात आला. प्रचंड उकाडा असल्यानं मृतदेह ठेवण्यासाठी या कुटुंबानं फ्रीजर व बर्फ आणला. त्यानंतर मंगळवारी दिवसभर मृतदेह खोलीतच होता. मंगळवारी रात्री दहा वाजता त्या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल आला. त्यात मयत व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मध्यरात्री आरोग्य विभागाला ही माहिती दिली. मात्र, या सगळ्यामध्ये मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांना बुधवारी पहाटेपर्यंत वाट बघावी लागली. त्यानंतर करोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याच्या नियमाप्रमाणे ७१ वर्षीय व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आला.