उत्तरप्रदेशच्या अलीगडमध्ये भाजपाच्या मुस्लीम नेत्या रुबी असीफ खान यांना नवरात्री निमित्त दुर्गापूजा केल्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुबी खान यांच्या विरोधात जागोजागी पत्रकं लावण्यात आली असून त्यावर ‘काफीर’ असं लिहीण्यात आलं आहे. तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना बहिष्कृत करून जिवंत जाळले पाहिजे असेही या पत्रकावर लिहिले आहे.

हेही वाचा – देवीला दाखवतात चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…

“सकाळी कोणीतरी दरवाज्याची बेल वाजवली. आम्ही दरवाजा उघडून बघितले असता, आमच्या शेजारच्या भिंतींवर काही पत्रकं चिपकवलेले दिसली. आम्ही काही पत्रकं काढून टाकलीत. तसेच आम्ही या घटनेची माहिती पोलिसांना दिली”, अशी प्रतिक्रिया रुबी खान यांनी दिली. या घटनेनंतर रुबी खान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहत सुरक्षेची मागणी केली आहे.

दरम्यान, याबाबत रुबी खान यांचे पती आसिफ खान यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, काही लोकं आम्हाला बदनाम करत आहेत. काही दिवसांपूर्वी खोटे ट्वीटर खाते उघडून आम्हाला शिवीगाळ करण्यात आली होती.”

हेही वाचा – नवरात्रोत्सवातच एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पाहा कोणाचे वेतन कितीने वाढले

भाजपा आणि हिंदू महासभा यांनीही रुबी खान यांचे समर्थन केले आहे. आपले संविधान कोणत्याही देवदेवतेची पूजा करण्याची परवानगी देते. त्यामुळे त्यांना त्रास देण्याऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या स्थानिक नेत्या शकुंतला भारती यांनी दिली आहे.

हेही वाचा – आदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी

रुबी आसिफ खान या भाजपाच्या स्थानिक नेत्या असून त्या अनेक दिवसांपासून हिंदू देवतांची पूजा करत आहेत. रुबी खान यांच्या विरोधात अशाच प्रकारचा फतवा गणेशोत्सवादरम्यानही निघाला होता. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात जात होत्या. तसेच दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या घरी राम दरबार आयोजित केला होता. त्यानंतर त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला होता.