महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षाचा परिणाम आज हिवाळी अधिवेशनावरही दिसून आला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या झाल्याची टीका केली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. शुक्रवार रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत असतानाच अचानक शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचे पडसाद आज दिल्लीतील राजकारणामध्ये दिसून आले. सकाळी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवसाचे काम सुरु झाले त्यावेळी लोकसभेमध्ये एकच गदारोळ झाला. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “मला या सभागृहामध्ये काही प्रश्न विचारायचे होते. मात्र आता त्याला काही अर्थ नाहीय कारण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधीपक्षाच्या नेत्यांनी ‘संविधानची हत्या बंद करा बंदा करा,’ अशी घोषणाबाजी केली. प्रश्न उत्तराच्या तासाला सुरुवात झाल्यानंतरही ही घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीमुळे दुपारी बारावाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं.

महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद राज्यसभेमध्येही दिसून आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ सुरु केल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यभेसेचे कामकाज तहकूब करण्यात आलं.

भाजपानं सरकार स्थापन करून सर्वांना चकित केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. या याचिकेवर सोमवारी न्यायलायाने दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णय उद्यासाठी (मंगळवार) राखून ठेवला आहे.