देशातील जनता नोटाबंदीच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांत वारंवार करण्यात येत आहे. मात्र, या दाव्याला छेद देणाऱ्या प्रतिक्रिया गुजरातमधील हिरे व्यापारी आणि कारागिरांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर हिऱ्यांच्या बाजारपेठेला मोठा फटका बसला असून येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. दिवाळीनंतर हिऱ्यांची बाजारपेठ अक्षरश: चौपट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथील एकही कारखाना सुरू झालेला नाही, असे हिऱ्यांच्या कारागिरीचे काम करणाऱ्या नागाजी यांनी सांगितले.

सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशातील अनेक लहान-मोठ्या उद्योगांपुढे संकट उभे राहिले होते. सूरतमधील हिरे व्यावसायिकांनाही त्याचाच प्रत्यय येत आहे. नोटबंदीनंतर सूरतमधील वराछा परिसरातील हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम आणि कारखाने अडचणीत सापडले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत केलेल्या भाषणात यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गाला बसणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार जाण्याची भीतीही त्यांनी बोलून दाखविली होती. या सगळ्याचा विपरीत परिणाम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर (जीडीपी) होणार असल्याचा इशाराही मनमोहन सिंग यांनी दिला होता.