रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच हजार रुपयांच्या नव्या नोटा आणल्या जाणार आहेत. एक हजाराची नोट नव्या स्वरुपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चलनात आणली जाणार आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. मात्र आता हजार रुपयाची नोट नव्या स्वरुपात चलनात आणली जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक हजार रुपयाच्या नव्या नोटांच्या छपाईला सुरुवात झाली. एक हजार रुपयाच्या नव्या नोटा जानेवारीतच चलनात आणल्या जाणार होत्या. मात्र तेव्हा पाचशे रुपयांच्या नोटांच्या छपाईचे कामकाज सुरु असल्याने हजार रुपयांच्या नोटांची छपाई करता आली नाही,’ अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

हजार रुपयांची नवी नोट नेमकी केव्हा चलनात येईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झाल्या. यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणण्यात आल्या. नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या १५.४४ लाख कोटी रुपये चलनातून बाद झाले. ‘२७ जानेवारीपर्यंत नव्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटांच्या स्वरुपात ९.९२ लाख कोटी रुपये चलनात आले आहेत,’ अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी ८ फेब्रुवारीला दिली होती.

२० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून रोख रक्कम काढण्याची मर्यादा दर आठवड्याला ५० हजार रुपये करण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा २४ हजार रुपये इतकी होती. १३ मार्चपासून बचत खात्यातून रोख रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठवले जाणार आहेत.