घटस्फोटित महिलेला पतीच्या   वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा देण्यासारख्या वादग्रस्त दुरुस्त्यांचा समावेश असलेला प्रस्तावित हिंदू विवाह कायदा मंत्रिगटाकडे सोपविण्याचा निर्णय आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतला. या कायद्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतरही मतभेद कायम राहिले. या कायद्यातील प्रस्तावित वादग्रस्त दुरुस्त्यांमुळे घटस्फोटांना चालना मिळेल, असा युक्तिवाद करीत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बाल कल्याणमंत्री कृष्णा तीरथ यांनीच आक्षेप घेतल्याचे समजते.
प्रस्तावित विधेयकात निवासी संपत्तीच्या पुनव्र्याख्येचा प्रयत्न करताना केवळ राहते घरच नव्हे तर पतीने कमावलेल्या वा वारसाहक्काने मिळविलेल्या अन्य संपत्तीचाही समावेश करण्यात येणार आहे. वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीचे विभाजन करणे शक्य नसेल तर त्यातील प्रमाणबद्ध वाटा रोखीच्या स्वरूपात घटस्फोटितेला दिला जावा, अशीही या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावित दुरुस्त्यांचा कृष्णा तीरथ तसेच विविध महिला संघटनांनी विरोध केला आहे. विवाह झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घटस्फोट झाला तरी घटस्फोटितेला संपत्तीत वाटा मिळण्याची या विधेयकात तरतूद असल्यामुळे त्याचा दुरुपयोगच होण्याची भीती निदर्शक व्यक्त करीत होते.
मतभिन्नतेमुळे हे विधेयक मंत्रिगटाकडे सोपविण्यात आले असून पुढच्या काही दिवसांत हे विधेयक पुन्हा मंत्रिमंडळापुढे येईल, असे सांगण्यात आले.
महत्त्वाचे निर्णय
*  १ लाख लोकसंख्या असलेल्या देशातील २९४ शहरांमध्ये ८३९ खासगी एफएम रेडिओ वाहिन्यांच्या लिलावाला परवानगी
*  शहरी भागांमध्ये राहणाऱ्या गरिबांना आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी २२ हजार ५०७ कोटींच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनच्या प्रस्तावाला मंजुरी
* फॉस्फेटिक आणि पोटॅशियम खतांवरील अनुदान रद्द
* चीनच्या घुसखोरीबद्दल लष्कर-प्रमुखांकडून बैठकीस माहिती