द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) सर्वेसर्वो आणि तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचं निधन झाल्याचं वृत्त हाती आलं आणि सर्वच स्तरांतू हळहळ व्यक्त करण्यात आली. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, मंगळवारी सांयकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

तामिळनाडूच्या जनसामान्यांचं अमाच प्रेम मिळवलेल्या एम. करुणानिधी यांनी राजकारणासोबतच कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. साहित्य क्षेत्रातकडे त्यांचा जास्त कल असल्यामुळे चित्रपटविश्वात त्यांनी पटकथालेखक म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्या लेखन कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रत्ययकारी पटकथा लिहिल्या आणि अतिशय महत्त्वाचे संदेशही जनसामान्यांपर्यंत पोहोचवले.
विधवा पुनर्विवाह, जमिनदारीची प्रथा पूर्णपणे बंद करण्याची मागणी, धर्माच्या नावाखाली होणारी दुष्कृत्य, अस्पृश्यता निवारण, शोषित जनतेला दिलासा देणाऱ्या पटकथांवर त्यांनी भर दिला.

‘पराशक्ती’ (‘Parasakthi’) या चित्रपटातून त्यांनी ब्राह्मण समाजातील काही नकारात्मक बाजू मांडल्या होत्या. हा चित्रपट तामिळ चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण देऊन गेला होता. ज्याच्यामाध्यमातून द्रविड चळवळीचा उदय झालाच. पण, त्यासोबतच दोन अभिनेत्यांनाही प्रसिद्धीझोतात आणलं. शिवाजी गणेशन आणि एस.एस.राजेंद्रन असं त्या दोन मातब्बर कलाकारांची नावं. या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती. ज्यानंतर १९५२ मध्ये तो प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर ‘पराशत्की’ला प्रचंड यश मिळालं होतं. पण, तो प्रदर्शित होईपर्यंतचा प्रवास मात्र फार कठीण आणि वादग्रस्त ठरला होता.

वाचा : गरीबांची बाजू घेणारा थोर नेता गेला-सुशीलकुमार शिंदे

पारंपरिक विचारसरणीच्या हिंदू धर्मियांकडून या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. कारण त्यातून ब्राह्मणवादावर थेट टीका करण्यात आल्या होत्या. फक्त हाच नव्हे तर, ‘पानम’ आणि ‘तंगराथनम’ (‘Panam’ and ‘Thangarathnam’) या चित्रपटांसाठीही त्यांनी अशाच समर्पण पटकथा लिहिल्या होत्या. चौकटीबाहेरच्या विचारसरणीमुळेच तत्कालीन पटकथाकारांच्या यादीत करुणानिधी अग्रस्थानी राहिले होते. त्यामुळे कलाविश्वात त्यांचं हे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही हेसुद्धा तितकच खरं.