औद्योगिक देशांच्या आघाडीच्या गटामध्ये रशियाचा पुन्हा समावेश झाला पाहिजे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवडाअखेर होणाऱ्या जी-७ देशांच्या शिखर परिषदेपूर्वी म्हटले आहे.

जी-७ देशांच्या शिखर परिषद बैठकीमध्ये रशियाचा सहभाग हवा, असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधून शिखर परिषदेला रवाना होताना वार्ताहरांना सांगितले. कॅनडातील शार्लेव्हॉइक्स येथे परिषद सुरू असून रशियाला तेथे परवानगी दिली पाहिजे, कारण चर्चेसाठी आम्हाला रशिया हवा आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

या गटाला २०१४ मध्ये जी-८ देश म्हटले जात होते, मात्र क्रिमिया खालसा केल्याने बहुसंख्य सदस्य देश रशियाविरुद्ध एकत्र आले आणि रशियाला या गटातून निलंबित करण्यात आले. ट्रम्प यांच्याशी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांच्याशी ट्विटरयुद्ध उडाले होते.