सत्तेवर आल्यास हिलरी क्लिंटन यांना इ-मेल प्रकरणात तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नरमाईची भूमिका घेतली असून, मी क्लिंटन यांच्यावर कारवाई करणार नाही असे म्हटले आहे. हवामान करार आपण मानत नाही हे वक्तव्यही त्यांनी मागे घेतले असून, त्यावर सकारात्मक विचार करण्याचा मार्ग खुला असल्याचे स्पष्ट केले.

न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की आपण काही बाबतीत टोकाची भूमिका घेणार नाही. हिलरी क्लिंटन यांच्या इ-मेल घोटाळय़ाची चौकशी करण्यासाठी अभियोक्ता नेमून त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा ट्रम्प यांनी केली होती, त्यावर माघार घेत ते म्हणाले, की क्लिंटन कुटुंबीयांना आपण दुखावणार नाही. क्लिंटन यांनी बराच त्रास भोगला आहे. आता त्यांना आपण त्रास देणार नाही.

आंतरराष्ट्रीय हवामान करार मोडीत काढण्यावरही त्यांनी बरीचशी माघार घेतली असून, आपण यावर बारकाईने विचार करीत आहोत असे म्हटले आहे. याबाबत आपण खुल्या मनाने विचार करू. स्फटिकासारखे निर्मळ पाणी व शुद्ध हवा आवश्यकच आहे असे त्यांनी सांगितले. याआधी हवामान बदल हा चीनने सुरू केलेला भंपकपणा आहे, असे सांगून ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करार रद्द करण्याचे संकेत दिले होते, त्यावरून माराकेश हवामान शिखर बैठकीत चिंतेचे सावट होते. दहशतवाद प्रकरणात अटक केलेल्यांचा छळ करण्याचा इरादाही त्यांनी आधी जाहीर केला होता, त्यावर त्यांनी माघार घेताना सांगितले, की नियोजित संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांना मी भेटलो तेव्हा त्यांनी अशा उपायांचा काही उपयोग नसल्याचा सल्ला दिला. तो मी मान्य करण्याचे ठरवले आहे. दहशतवादातील संशयितांना पाण्यात बुडवणे व छळ करणे अशा पद्धतींचा वापर करून वठणीवर आणले जाईल असे ट्रम्प यांनी सांगितले होते.