प्रौढांमधील सौम्य स्वरूपाच्या करोना संसर्गावरील उपचारासाठी पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा-२ ब (पेगआयएफएन) या औषधाचा आपत्कालीन वापर करण्याची भारतीय औषध नियामकांकडून आपल्याला मंजुरी मिळाली असल्याचे झायडस कॅडिला या औषध निर्मात्या कंपनीने शुक्रवारी सांगितले.

हेपॅटायटिसच्या उपचारासाठी असलेल्या वरील औषधाच्या अतिरिक्त उपयोगासाठी भारताच्या औषध महानियंत्रकांची (डीसीजीआय) मंजुरी मिळण्यासाठी आपण अर्ज केला असल्याचे कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते.

प्रौढांमधील सौम्य स्वरूपाच्या करोना संसर्गावर उपचार करण्यासाठी ‘विराफिन’, पेगआयएफएनचा आपत्कालीन मर्यादित वापर करण्यासाठी आपल्याला औषध महानियंत्रकांची मंजुरी मिळाली आहे, असे झायडस कॅडिलाने सांगितले. गंभीर स्वरूपाच्या हेपॅटायटिस बी व सी रोगाच्या रुग्णांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे औषध सुरक्षित मानले जात आहे.