गुजरातमध्ये ३१३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

सलीम कारा आणि अली कारा या दोन भावांकडून अमली पदार्थ घेतले असल्याची माहिती घोसीने पोलिसांना दिली.

DRUGS
(प्रातिनिधीक छायाचित्र)

खंभलिया (गुज) : गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत तीन जणांकडून ३१३.२५ कोटी रुपयांचे हेरॉइन आणि मेथॅम्फेटामाइन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

जप्त केलेले अमली पदार्थ हे पाकिस्तानमधून सागरी मार्गाने गुजरातमध्ये आणण्यात आले होते आणि तेथे तस्करी केली जात होती, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दोन व्यक्तींकडून बुधवारी एका छाप्यात जप्त करण्यात आलेल्या ४७ पाकिटांमध्ये २२५ कोटी रुपयांचे ४५ किलो हेरॉइन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्याआधी, पोलिसांनी मंगळवारी खंबालिया शहरातील एका विश्रामगृहातून महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्य़ातील मुंब्रा येथील भाजी विक्रेता सज्जाद घोसी याला पकडले आणि त्याच्याकडून ११.४८३ किलो हेरॉइन आणि ६.१६८ किलो मेथाम्फेटामाइनची ८८.२५ कोटी रुपये किमतीची १९ पाकिटे जप्त केली.

सलीम कारा आणि अली कारा या दोन भावांकडून अमली पदार्थ घेतले असल्याची माहिती घोसीने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी देवभूमी द्वारका जिल्ह्यातील सलाया या गावातील कारा बंधूंच्या घरावर छापा टाकून ४७ पाकिटे जप्त केली.

त्या पाकिटांची चाचणी केली असता, ४७ पाकिटांमध्ये २२५ कोटी किमतीचे ४५ किलो हेरॉइनचे असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घोसी याने यापूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे. तर सलीम कारा याला नाकरेटिक ड्रग्स अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, बनावट चलन आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

गुजरात हेच अंमली पदार्थाचे केंद्र ; शिवसेना आणि राष्ट्रवादीची टीका

मुंबई : गुजरातमधील मुंद्रा बंदरात सुमारे २० हजार कोटींचे अंमली पदार्थ आढळल्यावर द्वारका येथे गुरुवारी ३०० कोटींचे अंमली पदार्थाचा साठा जप्त के ल्याने गुजरात हे अंमली पदार्थाचे मुख्य केंद्र झाल्याची टीका शिवसेना आणि राष्ट्रवादीने के ली आहे. मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी कारवाईवरून भाजपने राष्ट्रवादीला लक्ष्य के ले असतानाच गुजरातमध्ये दोन घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साठा आढळल्याने शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी भाजपची सत्ता असलेले गुजरात राज्य हे अंमली पदार्थाचे मोठे केंद्र झाल्याची टीका के ली. गुजरातमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा आढळत असल्याने तेथील सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याची टीका खासदार राऊत यांनी केली. मुद्रा बंदरात सुमारे तीन हजार किलोग्रॅम साठा सापडला होता. त्याच्या तपासाचे काय झाले, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drugs worth rs 313 crore seized in gujarat zws

ताज्या बातम्या