निवडणूक आयोगाने घोषणा करण्यापूर्वीच भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या सामितीला सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर करण्यासाठी निवडणूक आय़ोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच अमित मालवीय यांनी ट्विटरद्वारे निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 12 मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होईल असं ट्विट मालवीय यांनी केलं होतं. जोरदार टीका व्हायला सुरूवात झाल्यानंतर त्यांनी ते ट्विट डीलिट केलं, आणि त्यानंतर निवडणूक आय़ोगाला पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं, पण त्यांचं स्पष्टीकरण आयोगाल पटलेलं दिसत नाही. कारण आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये मालवीय यांनी टीव्ही चॅनल पाहून निवडणुकीची तारीख ट्विट केल्याचं म्हटलंय. मी केलेल्या ट्विटमुळे अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. पण मी टाइम्स नाऊ हे चॅनल पाहून ट्विट केलं होतं. चॅनलने सकाळी 11.08 वाजताच याबाबत वृत्त दिलं होतं असं मालवीय यांनी म्हटलंय. दुसरीकडे , भाजपा देखील मालवीय यांच्या बचावासाठी पुढे आली असून ज्येष्ठ नेता मुख्‍तार अब्‍बास नकवी यांनी प्रतिनिधिमंडळासोबत निवडणूक आय़ोगाच्या अधिका-यांची भेट घेतली आणि मालवीय यांनी टीव्ही चॅनल पाहूनच ट्विट केल्याचं म्हटलं आहे.