हाडांच्या बळकटीसाठी पूरक औषधे घेण्याऐवजी व्यायाम करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. हाडांच्या बळकटीसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे हृदयविकाराचा धोका असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.

शरीराचे कोणतेही हाड मोडल्यानंतर किंवा व्यायाम करणारेही हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्त्व असलेली पूरक औषधे घेतात.

मात्र हाडांच्या बळकटीसाठी व्यायामच आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले. ‘यू.एस. प्रिव्हेन्टिव्ह सव्‍‌र्हिस टास्क’ या पॅनेलने ‘ड’ जीवनसत्त्वाच्या पूरक औषधांमुळे होणाऱ्या परिणामांची चर्चा केली. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या पूरक औषधांमुळे मूत्रपिंडाच्या आजाराबरोबरच कर्करोगाचाही धोका असल्याचे या वेळी संशोधकांनी सांगितले. वृद्धांना हे डोस देणे धोकादायकच असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

त्याचप्रमाणे महिलांनाही कमी प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाचे डोस दिल्यास त्याचा हाडांच्या बळकटीसाठी तितकासा लाभ होत नसल्याचे ‘यू.एस. प्रिव्हेन्टिव्ह सव्‍‌र्हिस टास्क’ या पॅनेलचे उपाध्यक्ष डॉ. अ‍ॅलेक्स क्रिस्ट यांनी सांगितले. आरोग्य चांगले असलेले ‘ड’ जीवनसत्त्वांचा डोस घेत असल्यास त्यांनी ही औषधे घेणे थांबवावे, असेही क्रिस्ट म्हणाले.

या औषधांपेक्षा व्यायाम करणे हाडांच्या बळकटीसाठी अधिक लाभदायक असल्याचेही त्यांनी सांगितले. काही लोकांना पूरक आहार मिळत नसल्याने त्यांना ‘ड’ जीवनसत्त्वासाठी पूरक औषधे घ्यावी लागतात, असेही ते म्हणाले.