दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात मोठा आत्मघातकी स्फोट झाला आहे. शुक्रवारी झालेल्या या स्फोटात ५२ लोक ठार झाले असून ५० जण जखमी असल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ हा स्फोट झाला आहे. या ठिकाणी प्रेषित मुहम्मद यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाविक जमले होते. पाकिस्तान मीडिया हाऊस डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, ईद मिलादुन नबी उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात येत असताना हा स्फोट झाला .

स्थानिक पोलिसांनी डॉनला दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंगचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गशकोरी यांचाही या स्फोटात मृत्यू झाला आहे. संशयित आत्मघाती हल्लेखोराने ऑन-ड्युटी पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला. दि पाकिस्तानी फ्रंटिअर या पाकिस्तानी वृत्तस्थळाने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला मृतदेह आणि कापलेले हातपाय आजूबाजूला पडलेले दिसत आहेत. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

सुरक्षा व्यवस्था वाढवली

स्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कराची पोलिसांना ईद मिलाद-उन-नबी आणि शुक्रवारच्या नमाज संदर्भात शहरातील सुरक्षा उपाय कडक करण्यासाठी आणि अत्यंत सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत”, असे उर्दूमधील ट्विटमध्ये म्हटले आहे.