१६ वर्षांनंतर जर्मनीच्या चॅन्सेलर पदावरून पायउतार; ओलाफ शोल्त्झ नवे चॅन्सेलर

तब्बल १६ वर्षे जर्मनीचे चॅन्सेलर पद भूषवणाऱ्या अँगेला मर्केल यांची राजकीय कारकीर्द बुधवारी संपुष्टात आली. जर्मनीच्या सर्वोच्च पदावर १६ वर्षे विराजमान झालेल्या आणि जगातील ‘सक्षम महिला नेत्या’ असा बहुमान मिळवलेल्या मर्कल यांच्या राजवटीचा अस्त झाला असला तरी त्यांच्या उदारमतवादी धोरणांमुळे इतिहासात त्यांचे नाव कोरले गेले आहे.

मर्केल यांचे उत्तराधिकारी ओलाफ शोल्त्झ हे बुधवारी चॅन्सेलरपदी विराजमान झाले. मर्केल यांच्या प्रशासनात स्कोल्झ उपचॅन्सेलर आणि अर्थमंत्री होते.

मूळच्या वैज्ञानिक असलेल्या मर्केल यांचे पालनपोषण कम्युनिस्टांचा पगडा असलेल्या पूर्व जर्मनीत झाले. १६ वर्षे चॅन्सेलरपद भूषवले असले तरी एकेकाळचे त्यांचे मार्गदर्शक हेल्मुट कोहल यांचा विक्रम त्या मोडू शकल्या नाहीत. कोहल १९८२-९८ असे १६ वर्षे चॅन्सेलरपदी होते. कोहल यांच्या कारकीर्दीपेक्षा एक आठवडा कमी कारकीर्द मर्केल यांची आहे. पूर्व   आणि पश्चिम जर्मनी एकत्र करण्यास कोहल यांचा मोठा वाटा आहे.

१६ वर्षांत मर्केल या केवळ जर्मनीतच नव्हे जगभरात लोकप्रिय झाल्या. प्रभावी नेतृत्वामुळे युरोपीय संघावर त्यांचे वर्चस्व होते. निर्णय घेण्याची क्षमता आणि अडचणींवर मात करण्याची हातोटी यांमुळे  महिलांसाठी त्या आदर्श ठरल्या.

आपल्या कारकीर्दीत त्यांनी चार अमेरिकी अध्यक्ष, फ्रान्सचे चार अध्यक्ष, ब्रिटनचे पाच पंतप्रधान, इटालीचे आठ पंतप्रधान यांच्यासमवेत काम केले आहे.   जागतिक आर्थिक संकट, युरोपवर कर्ज संकट, २०१५-१६मध्ये युरोपमध्ये वाढलेला निर्वासितांचा ओघ आणि करोना विषाणूचे महासंकट या आव्हानांवर मात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

‘‘अँगेला मर्केल यांनी जर्मनीला सक्षम नेतृत्व दिले. जगात जर्मनीची प्रतिमा उंचावण्यात मर्केल यांचा मोठा वाटा आहे,’’ असे गौरवोद्गार जर्मन मार्शल फंडच्या उपसंचालक सुधा डेव्हिड-विल्प यांनी काढले. २००५मध्ये जेव्हा त्या पहिल्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी विराजमान झाल्या, त्या वेळी त्यांना अनेकांनी कमी लेखले. मात्र त्यांनी आपल्या कामावर लक्ष वेधून जर्मनीची भूमिका जगात ठामपणे मांडली, असे विल्प यांनी सांगितले.