अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी ५६ वर्षांच्या इसमास येथील जलदगती न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा ठोठावली. महिलांवरील अत्याचारांप्रकरणी निवाडा करण्यासाठी द्वारका कोर्ट संकुलात अलीकडेच हे न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.
भरतसिंग असे या इसमाचे नाव असून पश्चिम दिल्लीतील एका फार्महाऊसवर तो रक्षकाचे काम करीत होता. भरतसिंग याने दोन वर्षांपूर्वी एका रिक्षाचालकाच्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्याचवेळी तिचा मृत्यू झाला. भरतसिंगचे हे अमानुष कृत्य ‘दुर्मिळात दुर्मीळ’ स्वरूपात मोडत असल्याचे मत अतिरिक्त सत्र न्यायाधीश वीरेन्द्र भट यांनी मांडले. भरतसिंग यास न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड केला असून जन्मठेप व अतिरिक्त ५० हजार रुपयांचा दंड केला आहे. अशा व्यक्ती समाजासाठी धोकादायक ठरू शकतात त्यामुळे त्यांना माफी मिळण्यास त्या पात्र नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.