अमृतसर : पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी गोळय़ा झाडून हत्या करण्यात आलेले पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूसा या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला प्रचंड जनसमुदाय उसळला होता. दरम्यान या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी २४ तासांच्या आत पहिल्या आरोपीस अटक केली आहे. त्याला मन्सा येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक केलेल्या आरोपीचे नाव मनप्रितसिंग भाऊ असे असून त्याला अन्य पाच जणांसह देरहादून येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो फरिदकोटच्या धापुरी गावचा रहिवासी आहे. त्याचा चुलतभाऊ मनप्रितसिंग मुन्ना हा सध्या  न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर गुंड कलबिर नरुना याच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे. मनप्रितसिंग भाऊ याने मूसेवाला यांच्या मारेकऱ्यांना  त्यांची माहिती पुरविल्याचा पोलिसांचा संशय आहे.

२७ वर्षीय सिद्धू मूसेवाला यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी विविध भागांतील लोक मूसा गावाकडे निघाल्याने मंगळवारी त्या भागातील रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. त्यामुळे दूरवरून लोक  चालत  मूसा गावाकडे निघाले. मूसेवाला यांचे विविध राज्यांतील चाहते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. मूसा हे गाव मन्सा जिल्ह्यात आहे.  पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. अंत्यसंस्कारासाठी जमलेले चाहते काही तास ताटकळत राहिल्यानंतर मूसेवाला यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी जेवण आणि पेयजलाची व्यवस्था केली. मूसेवाला यांच्या घराबाहेर प्रचंड संख्येने जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना आवरण्यासाठी सुरुवातीला पोलिसांना लाठीमारही करावा लागला.  

सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौरसिंग आणि आई चरणकौर सिद्धू यांना सातत्याने अश्रू अनावर होत होते. पंजाबमधील प्रथेनुसार अविवाहित सिद्धू मुसेवाला यांना अंतिम निरोप देताना त्यांच्या पार्थिवावर नवरदेवासारखा पोशाख चढविण्यात आला होता. मूसेवाला कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत त्यांचे आईवडील सिद्धू यांची सोयरिक जमविण्याच्या प्रयत्नात होते.

आईने मुलाला सेहरा बांधला ..

सिद्धू यांची आई ही गावची सरपंच असून त्यांनी सिद्धू यांचे केस विंचरून त्यांच्या डोक्याला पगडी बांधून सेहरा चढवला. सिद्धू यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मिशांना पीळ भरला. गायक सिद्धू हे त्यांच्या आल्बममध्ये मिशीवर ताव मारताना अनेकदा दिसतात. इतकेच नव्हे तर प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्यासाठी जशी मांड ठोकली जाते, तशी मांडही सिद्धू यांच्या वडिलांनी पार्थिवाच्या मांडीवर आपल्या हाताने ठोकली. पार्थिव वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला वरातीच्या कारप्रमाणे सजविण्यात आले होते. चाहत्यांच्या घोषणा अखंड सुरू होत्या.