दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील लढाई आता ऑपरेटिंग सिस्टिमवर येऊन ठेपली आहे. स्मार्टफोनच्या बाजारातील ९० टक्के हिस्सा असलेल्या गुगलच्या अँड्रॉइड आणि अ‍ॅपलच्या आयओएसला टक्कर देण्यासाठी जपानच्या एका कंपनीने ‘टायझेन’ नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, सॅमसंग आणि एलजी या प्रसिद्ध स्मार्टफोन कंपन्यांसह जपान, चीन, दक्षिण कोरिया, युरोप आणि अमेरिकेतील अनेक मोबाइल कंपन्यांनी यासाठी एकी केली आहे.
जपानमधील मोबाइल फोन सेवा कंपनी एनटीटी डोकोमोने मार्च महिन्यापासून ‘टायझेन’ आणण्याचे बुधवारी जाहीर केले. ‘टायझेन’च्या निर्मितीमध्ये डोकोमोचा प्रमुख सहभाग असला तरी अमेरिकेतील इंटेल, दक्षिण कोरियातील सॅमसंग व एलजी, जपानची फुजित्सू, युरोपमधील व्होडाफोन व ऑरेंज आणि चीनची हुवेई या मोबाइल जगतातील नामांकीत कंपन्या यासाठी एकत्रित आल्या आहेत. सध्या आघाडीवर असलेल्या अँड्रॉइड आणि आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमना ‘टायझेन’ नक्कीच मागे टाकेल, असा विश्वास या कंपन्यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे टायझेन?
संगणकातील लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर ‘टायझेन’ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे.  ही ‘मुक्त स्त्रोत’(ओपन सोर्स) ऑपरेटिंग सिस्टिम असल्याने त्यावर कोणा एका कंपनीची मालकी नसेल. यात तयार करण्यात आलेले अ‍ॅप हे अँड्रॉइड, विंडोज आणि आयओएस अशा ऑपरेटिंग सिस्टिमवरही कोडिंगमध्ये थोडाफार फरक करून वापरता येणार आहे. हे अ‍ॅप तयार करताना ‘एचटीएमएल ५’चा वापर करता येणार आहे. यापूर्वीच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर अ‍ॅप तयार करण्यासाठी ‘ऑब्जेक्टिव्ह सी’ अशा तांत्रिक भाषांचा वापर करावा लागत असे.
बेकी असलेल्यांची एकी
एकमेकांशी कट्टर स्पर्धा असलेल्या कंपन्या ‘टायझेन’च्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. जपानची फुजित्सू, अमेरिकेची इंटेल, दक्षिण कोरियाची सॅमसंग आणि एलजी, चीनची हुवाई आणि युरोपमधील वोडाफोन आणि ऑरेंज या कंपन्या सन २०११मध्ये एकत्र आल्या असून, तेव्हापासून त्या या ऑपरेटिंग सिस्टमची निर्मिती करत आहेत. आणखी विशेष म्हणजे, राजकीय मुद्यांवरून एकमेकांच्या विरोधात असलेले जपान, चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया हे देशही या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले आहेत.
ऑपरेटिंग सिस्टिमची बाजारपेठ
सध्या अँड्रॉइड आणि आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीम आघाडीवर आहेत. डिसेंबर २०१३च्या आकडेवारीनुसार जगभरात १४०कोटी स्मार्टफोनधारक असून यातील ७९कोटी ८० लाख हे अँड्रॉइड तर २९ कोटी ४० लाख हे आयफोन वापरकर्ते आहेत.