अल-कायदा इंडिया या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका प्रमुख कमांडरसह पाच दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या पोलिसांनी अटक केली आहे. या गटानेच कराचीतील नाविक तळावर गेल्या सप्टेंबर महिन्यांत दहशतवादी हल्ला केला होता.
गुन्हा अन्वेषण विभागाच्या दहशतवादविरोधी पथकाने दहशतवाद्यांना अटक केली. कराचीतील नाविक तळावर हल्ला करणाऱ्या या दहशतवाद्यांनी पुन्हा तळावर हल्ला करण्याची योजना आखली होती तेव्हाच त्यांना अटक करण्यात आली, असे उमर खत्ताब या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून सदर दहशतवाद्यांना जुन्या हाजी कॅम्प विभागातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १० किलो स्फोटके, दोन रायफली, तीन पिस्तुले हस्तगत करण्यात आली. कारी शाहीद उस्मान, आसद खान, फवाद खान, शाहीद अन्सारी आणि उस्मान ऊर्फ इस्लाम अशी त्यांची नावे आहेत.
कारी शाहीद उस्मान हा कराचीतील अल-कायदा इंडियाचा मुख्य कमांडर असून असीम उमेर हा पाकिस्तानातील प्रमुख आहे. उस्मान याने अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले आहे. इलियास काश्मिरी याच्यासमवेत उस्मान याने भारतीय जवानांवरही हल्ले केले आहेत. या प्रांतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी अल-कायदा इंडिया हा नवा दहशतवादी गट स्थापन करण्यात आला आहे.