काँग्रेस खासदार शशी थरूर यांचं इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सर्वश्रूत आहे. थरूर यांनी काल(दि.10) पंतप्रधान नेरंद्र मोदींवरील आपल्या ‘द पॅरोडॉक्सियल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाचं ट्विटरद्वारे लोकार्पण केलं. पण या पुस्तकापेक्षा त्यांनी केलेल्या ट्विटचीच तुफान चर्चा रंगली. कारण, पुस्तकाबाबत माहिती देताना त्यांनी ट्विटरवर इंग्रजीतला एक असा शब्द वापरला की, सोशल मीडियावरील बहुतांश युजर चक्रावून गेले. या शब्दाचा अर्थ तर लांबच राहिला पण साधा उच्चार करतानाही बोबडी वळते.

आपल्या पुस्तकाबाबत माहिती देताना थरूर यांनी इंग्रजी शब्द ‘फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’ चा वापर केला. ‘माझं नवं पुस्तक, ‘द पेराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर…यामध्ये 400 पानांव्यतिरिक्त ‘फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’वर मी मेहनत घेतली आहे’, असं ट्विट त्यांनी केलं. त्यांच्या या ट्विटनंतर ‘फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’ या शब्दाचा अर्थ आणि उच्चार याबाबत युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली. अनेक युजर्स आपआपल्या पद्धतीने या शब्दाचा अर्थ काढायला लागले. काहींनी यावरुन थरूर यांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. या पुस्तकासोबत तुमचा स्वतःचा एखादा शब्दकोश संग्रह मिळेल का असा सवालही अनेकांनी थरूर यांना विचारला.

‘विनाकारण कोणतीही गोष्ट निरर्थक ठरविण्याची सवय’ असा थरूर यांच्या त्या ट्विटचा अर्थ होतो. हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यासाठी थरूर यांनी या शब्दाचा वापर केला होता हे स्पष्ट आहे. पण अशाप्रकारे एखाद्या वेगळ्या शब्दाचा वापर करण्याची थरूर यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा त्यांनी आपल्या इंग्रजी भाषेच्या शब्दसंग्रहाचा पुरेपुर वापर केला आहे. थरूर हे आपल्या फाडफाड इंग्रजी बोलण्यासाठी ओळखले जातात. संसदेत किंवा माध्यमांना संबोधत असतानाही ते अनेकदा अशा काही शब्दांचा वापर करतात की त्याचा उच्चारही अनेकांना करता येत नाही. यापूर्वी काही नेत्यांनी आणि मंत्र्यांनी तर खुलेपणाने थरूर यांची इंग्रजी समजत नसल्याचं म्हटलंय. पाहुयात थरूर यांनी केलेलं ट्विट –