पाकिस्तानी न्यायालयाकडून कथित गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना सुनाविण्यात आलेली फाशीची शिक्षा म्हणजे त्यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी रावळपिंडीच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताकडून अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानच्या या निर्णयाविषयी तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने यासंदर्भात पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला खरमरीत पत्र लिहले आहे. या पत्रात भारताने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावली जाताना अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर भारत त्याच्याकडे पूर्वनियोजित हत्येचा कट म्हणूनच पाहिल, असे या पत्रात म्हटले आहे. याशिवाय, या पत्रात भारताने अनेक मुद्दे मांडले आहेत.

पाकिस्तानने जाधव यांना बलुचिस्तानमध्ये पकडल्याचा दावा  खोटा असून त्यांचे इराणमधून अपहरण करण्यात आल्याचा आरोप भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तसेच गेल्या वर्षभरात भारताने कुलभूषण जाधव यांना राजदूतावासाशी संपर्क साधू देण्याची (कॉन्सुलर अ‍ॅक्सेस) १३ वेळा विनंती केली. मात्र, एकदाही पाकिस्तानने भारताच्या या मागणीला सहकार्य केले नाही. तसेच कुलभूषण यांच्यावर कोणताही ठोस पुरावा नसल्याचे खुद्द पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी कबूल केले होते. याशिवाय, पाकिस्ताने एकदाही यासंदर्भात आंतरराष्ट्रीय जनसमुदायासमोर हा प्रश्न मांडलेला नाही. त्यामुळे जाधव यांना सुनाविण्यात आलेली शिक्षा आणि कारवाई हास्यास्पद असल्याचे भारताने म्हटले आहे. हा संपूर्ण खटलाच एकप्रकारचा बनाव होता. या संपूर्ण सुनावणीदरम्यान मुलभूत हक्कांनुसार जाधव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकीलही देण्यात आला नव्हता. कुलभूषण जाधव हे भारताची गुप्तहेर संस्था ‘रॉ’साठी काम करत असल्याचा पाकचा आरोप होता. मग त्यांच्यावर खटला सुरू करताना भारताच्या उच्चायुक्तांना साधी माहितीही दिली गेली नाही, ही बाब लक्षात घेण्याजोगी असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मार्च महिन्यात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. मूळचे मुंबईचे असलेले कुलभूषण जाधव हे नौदलातील माजी अधिकारी आहेत. मुदतीपूर्वीच त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. निवृत्तीनंतर त्यांनी जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. जाधव यांना आमिष दाखवून बलुचिस्तानात नेण्यात आले होते. ते भारताचे नागरिक आहेत, पण ते गुप्तहेर नाहीत असे केंद्र सरकारचे म्हणणे होते. पण पाकिस्तान मात्र कुलभूषण जाधव हे भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा केला होता. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला होता.