पीटीआय, चार्ल्सटन

अमेरिकेत वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी अतिशय महत्त्वाचा विजय मिळवला. साउथ कॅरोलिना येथे त्यांनी तेथील माजी गव्हर्नर आणि प्रमुख प्रतिस्पर्धी निकी हॅले यांचा पराभव केला. मात्र, या पराभवाने खचून न जाता उमेदवारीसाठी लढत देणारच असल्याचे हॅले यांनी स्पष्ट केले.

साउथ कॅरोलिनाची लढत अटीतटीची आणि हॅले यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, गृहराज्यातच पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांचा उमेदवारीचा दावा कमकुवत झाल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी ट्रम्प यांची सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या निवडणुकीत हॅले यांना ३९.५ टक्के तर ट्रम्प यांना ५९.८ टक्के मते मिळाली.

हेही वाचा >>>प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला

यानंतर ५ मार्चला २१ राज्यांमध्ये उमेदवारीसाठी मतदान होणार आहे. आतापर्यंत आयोवा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा आणि यूएस व्हर्जिन आर्यलड येथे झालेल्या सर्व मतदानांमध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी १,२१५ डेलिगेट्सची गरज आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत १०२ तर हॅले यांनी १७ डेलिगेट्स मिळवले आहेत.