राष्ट्रपती भवनाला तुम्हाला भेट द्यायची आहे तर मग आता माऊसच्या एका ‘क्लिक’वर ते शक्य होणार आहे. राष्ट्रपती भवनातील सचिव ओमिता पॉल यांनी यासंबंधात ऑनलाइन सुविधेचे शुक्रवारी अनावरण केले. यामुळे आता इच्छुकांना या ऐतिहासिक वास्तूला मोफत भेट देणे शक्य होणार आहे.
१ जानेवारी, २०१३ पासून आता रविवारीही इच्छुकांना येथे भेट देता येईल. जास्तीत जास्त लोकांना या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेता यावे म्हणून याचा प्रवेश कालावधीही वाढवण्यात आला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० दरम्यान पाहुण्यांना या ठिकाणी भेट देता येईल, असे राष्ट्रपतींचे प्रसारमाध्यम सचिव वेणी राजामणी यांनी प्रसृत केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
इंटरनेट आणि ई-मेलची सुविधा नसलेल्या पाहुण्यांना राष्ट्रपती भवनच्या भेटीसाठी पूर्वीप्रमाणेच उप-लष्करी सचिवांकडे अर्ज करण्याची पद्धत कायम ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवनच्या ‘डब्लूडब्लूडब्लू.प्रेसिडेंटऑफइंडिया.निक.इन’ या संकेतस्थळावरील उजव्या बाजूच्या लिंकवर ‘क्लिक’ करून राष्ट्रपती भवनाच्या भेटीचे आरक्षण इच्छुक करू शकतील.