भारत आणि जर्मनी या दोन देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी गेली अनेक दशके प्रयत्न करणाऱ्या तीन भारतीयांच्या कामाची दखल घेत जर्मनीने त्यांचा ‘क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्काराने गौरव केला आहे.
येथील जर्मनीच्या राजदूत मायकेल स्टेनर यांच्या हस्ते मंगळवारी एका कार्यक्रमात आनंद सिंग बावा, कल्याण सचदेव आणि सईद हसनैन यांचा गौरव करण्यात आला.
बावा हे भारतातील इंडो-जर्मन सोसायटीचे मानद सचिव आहेत. जर्मन भाषेतील पुस्तकांचा अनुवाद करून ती भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासह अनेक उपक्रमांत त्यांचा मोठा सहभाग आहे, तर सचदेव हे गुरगाव येथील रुग्णालयाचे संस्थापक आहेत. १९७५ पासून जर्मन दूतावासाशी जोडल्या गेलेल्या सचदेव यांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हसनैन सूक्ष्मजीव वैज्ञानिक आहेत. क्षयरोगासंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाबाबत गौरव करण्यात आला.