ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी हे सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सर्व धर्म आणि जातींना आपापला नेता आहे, मग तुम्ही तुमचा प्रतिनिधी कधी निवडणार? असं म्हणत ओवेसी मुस्लिमांना त्यांच्या पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. याच दरम्यान, ओवेसी यांच्या पक्षाच्या नेत्याचे एक वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे.

एमआयएम अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले जन्माला घालावी लागतील, असे म्हणताना दिसत आहे. गुफरान नूर म्हणतात की, “जर मुस्लिमांना जास्त मुलं होणार नाहीत, तर मग आपला समाज भारतावर राज्य कसा करणार?. आपली संख्या जास्त नसेल तर असदुद्दीन ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होतील, शौकत अली साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कसे होतील,” असे ते म्हणताना दिसत आहेत.

“ दलित, मुस्लिमांना मुलं जन्माला घालण्यापासून रोखण्यासाठी धमकावले जात आहे. आम्ही का मुलं जन्माला घालू नयेत? हे आमच्या शरियतच्या विरोधात आहे,” असंही ते म्हणाले. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नूर यांनी स्पष्टीकरण दिलंय. “जेवढा सहभाग आम्ही बलिदानात दिलाय, आमचा तेवढा सहभाग मुलं जन्माला घालण्यात नाही. ओवेसी साहेब पंतप्रधान व्हावेत, ते कसे होईल, अशी चर्चा सुरू होती, त्यात मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले. आणि त्यात मी काहीही चुकीचे बोललो नाही.”

निवडणूक रॅलींमध्ये स्वत:ला धर्मनिरपेक्ष नेता म्हणवून घेणारे ओवेसी स्वत:ला मुस्लिम, मागास वर्ग आणि दलितांचे नेते म्हणतात. पण यूपी विधानसभा निवडणुकांवर नजर टाकली असता ओवेसींचे लक्ष्य युपीच्या १९% मुस्लिम मतदारांवर असल्याचं जाणवतं. या मतदारांचा प्रभाव राज्यातील १४३ जागांवर असल्याचे मानले जाते. त्यामुळे एमआयएम मुस्लिम बहुल जागांवर निवडणूक लढवण्याची रणनीती बनवत आहे.