गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे ‘वॉरेन बफेट’ म्हटले जाणारे शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या मते, ‘भारताच्या आर्थिक विकासाबाबत चिंता करण्याचं काहीही कारण नाही’. इतकंच नाही तर, ‘ज्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक विकासाबाबत शंका वाटते त्यांनी भारतात गुंतवणूक करुच नये, उलट पाकिस्तानात जाऊन गुंतवणूक करावी’ असा सल्लाही झुनझुनवाला यांनी दिला आहे.

27 सप्टेंबर रोजी ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम 2019’ मध्ये बोलताना झुनझुनवाला यांनी, भांडवली बाजारातील गुंतवणूक, मालमत्ता वाटप आणि भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत चर्चा केली. ही चर्चा सुरू असताना एका ब्रिटिश गुंतवणूकदाराच्या प्रश्नांनी झुनझुनवाला चांगलेच त्रस्त झाले. लंडनमधील गुंतवणूकदार सुभाष ठकरार हे या फोरममध्ये उपस्थित होते. झुनझुनवाला बोलत असताना ठकरार हे त्यांना वारंवार भारतातील वाढत्या बेरोजगारीबाबत प्रश्न विचारत होते. ठकरार हे ‘लंडन चेम्बर ऑफ कॉमर्स’चे माजी चेअरमन देखील आहेत. ठकरार यांच्या पहिल्या प्रश्नावर झुनझुनवाला यांनी, ‘चांगला विकास दर हाच बेरोजगारीच्या समस्येवरील उपाय आहे’, असं उत्तर दिलं. त्यावर ठकरार यांनी, ‘गेल्या दशकभरात विकास दरामध्ये इतकी वाढ झाली, पण तरीही बेरोजगारी काही कमी झालेली नाही’ असा प्रश्न विचारला.  दोघांमध्ये यावरुन वादविवाद सुरू झाला. त्यानंतर एक वेळ अशी आली की, झुनझुनवाला चांगलेच वैतागले व त्यांनी गुंतवणूकदाराला गप्प बसण्यास सांगितलं.

सुभाष ठकरार यांनी भारताला परकीय गुंतवणूकीची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यावर झुनझुनवाला चांगलेच वैतागले आणि ‘जाऊन पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करा…आम्हाला तुमच्यासारखे संशयी परदेशी गुंतवणूकदार नको आहेत’, असं म्हटलं. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यामुळे परकीय गुंतवणूक आपोआप येईल असंही झुनझुनवाला पुढे म्हणाले. पण, कार्यक्रम संपल्यावर आपण मोठ्या आवाजात उत्तर दिल्याचं लक्षात आल्यामुळे झुनझुनवाला यांनी ठकरार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.