काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जावई आणि प्रियांका गांधी यांचा पती रॉबर्ट वढेरा यांना त्यांच्याच विनंतीवरून विमानतळावरील अतिमहनीय व्यक्तींच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यामुळे त्यांना यापुढे सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात वढेरा यांना विमानतळावर महनीय व्यक्तींची वागणूक दिली जात होती. या वेळी त्यांनी सोबत सुरक्षा रक्षकाला घेऊन जाण्याची परवानगी होती. केंद्रात भाजपचे सरकार आले तरीही वढेरा यांचे नाव महनीय व्यक्तींच्या यादीमध्ये होते. यामुळे ‘सरकारी जावई’ अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती. तसेच वढेरांची सुरक्षा व्यवस्था आणि विमानतळावरील त्यांची न होणारी तपासणी हा मुद्दा अनेकदा चर्चेत आला होता. मात्र यावर केंद्राच्या अधिकाऱ्यांनीच स्पष्टीकरण देत पडदा टाकला होता.
मात्र, दोन दिवसांपूर्वी वढेरा यांनीच फेसबुक या समाजमाध्यमावरून विमानतळावरील महनीय व्यक्तींच्या यादीतून आपले नाव वगळण्याची मागणी केली होती. तसेच आपल्या नावावर पांढऱ्या रंगाची पट्टी लावणार असल्याचे सांगितले होते. यावर केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेत अतिमहनीय व्यक्तींच्या यादीतून नाव वगळले आहे.
महनीय व्यक्तींच्या यादीचा आढावा घेण्यात येत असून पूर्वीच्या सरकारने वढेरांना दिलेली सूट त्यांच्या विनंतीवरून काढून घेत असल्याचे नागरी विमानोड्डाण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले. याबाबत वढेरांनी फेसबुकवर आभार मानले आहेत.