सुरतमध्ये फिरताना खूप सारी मराठी माणसं भेटतात. सहजपणे ते मराठी असल्याचं ओळखू येत नाही. इतके ते इथल्या रंगात मिसळून गेलेत. पण तुम्ही मराठीत एकमेकांशी बोलताहात कळल्यावर ते पण तुमच्याशी मराठीतच बोलू लागतात आणि मग एकामागून एक विषय निघत जातो आणि गप्पा सुरू होतात. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदूरबार येथून सुरतमध्ये आलेल्या आणि या शहरात स्थायिक झालेल्या मराठी लोकांची संख्या जास्त आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या इतरही भागातून इथे स्थायिक झालेले लोकही आहेत. यापैकी अनेकजण कापड व्यवसायात स्थिरावलेत तर बाकीचे वेगवेगळ्या व्यवसायात. गुजरातमधल्या बदलाचे ते साक्षीदार आहेत. अनेकांची दुसरी पिढी सध्या गुजरातमध्ये राहते. त्यामुळे ते इथल्या राजकीय वातावरणाकडे, होत असलेल्या निवडणुकांकडे कसे बघतात, हे समजून घेतले पाहिजे.

Gujarat Election Blog : खदखद, धकधक आणि जीएसटी…

रिक्षातून आम्ही काँग्रेसच्या कार्यालयाकडे निघालेलो असतो… रिक्षाचालक मराठी आहे हे माहिती नसते… आम्ही मराठी बोलतोय म्हटल्यावर तो सुद्धा आमच्याशी मराठीतच बोलू लागतो आणि मग प्रवास संपेपर्यंत हा संवाद सुरूच राहतो. संजय बागूल गेल्या दोन दशकांपासून सुरतमध्ये रिक्षा चालवताहेत. ते मुळचे नगर जिल्ह्यातील कोपरगावचे. १९८२ मध्ये सुरतमध्ये आले आणि सुरतकरच झाले. गरीब कुटुंबातून आलेल्या बागूल यांना पोटापाण्याच्या व्यवसायासाठी इकडे यावे लागले आणि त्यांनीही ती परिस्थिती स्वीकारली आणि या शहरात रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. आज याच व्यवसायाच्या जोरावर त्यांचा मुलगा आयटीआयमध्ये शिकला आणि ‘एल अॅण्ड टी’मध्ये कामाला लागला. गेल्या २० वर्षांत गुजरातमध्ये काय काय बदल झाले हे त्यांनी जवळून पाहिलंय. स्वतःचे उदाहरण सांगताना त्यांनी ‘मुख्यमंत्री अमृततुल्य कार्ड’चे उदाहरण दिले. हे कार्ड गरिबांसाठी किती उपयुक्त आहे, याबद्दल ते भरभरून बोलतात. सर्व प्रकारच्या मोठ्या शस्त्रक्रिया, किचकट आजारांवरील उपचार या कार्डामुळे निःशुल्क होतात. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर अवघ्या एक रुपयात कार्ड तुमच्या घरपोच येते. मग तुम्ही शासकीय रुग्णालयांमधून तुमच्यावरील आणि कुटुंबियांवरील उपचार मोफत करून घेऊ शकतात. खासगी रुग्णालयाचा भलामोठा खर्च आमच्यासारखांना परवडणारा नाही. पण या कार्डामुळे आम्हाला शासकीय रुग्णालयात चांगले उपचार मिळताहेत, बागूल सांगतात. गुजरातमधील निवडणुकीबद्दल विचारल्यावर ते जास्त काही बोलत नाहीत. ‘मी लाभार्थी’ या त्यांच्या भूमिकेतून त्यांचे उत्तर मिळालेले असते.

संजय बागूल यांच्याप्रमाणेच दीपक हा सुद्धा महाराष्ट्रातूनच गुजरातमध्ये स्थायिक झालेला. सुरत टेक्सटाईल मार्केटमधील एका दुकानात तो काम करतो. सुरतमध्ये आलेला कोणताही माणूस बसून राहत नाही. त्याला हाताला काही ना काही काम मिळतेच. हे शहर त्याला पोटापाण्याचा काहीतरी व्यवसाय देतेच. गुजरातमधल्या निवडणुकांचा विषय निघाल्यावर तो फार क्रांतिकारक काही घडेल असे वाटत नाही, इतकंच सूचक उत्तर देतो. त्याचा म्हणण्याचा अर्थ सूज्ञास उलगडून सांगण्याची गरज नाही.

मूळचे जळगावचे असलेले आणखी एक रिक्षा व्यावसायिकही गुजरातमध्ये सध्या काय सुरू आहे, हे जवळून बघताहेत. यावेळची परिस्थिती वेगळी असल्याचे ते मान्य करतात. पण लोकांपुढे असलेला पर्याय सक्षम हवा. तो असेल तरच ते बदल घडवतात नाहीतर नाही, एवढाच मुद्दा ते मांडतात.

सुरतमध्ये सुमारे पाच लाखांच्या आसपास मराठी माणसं राहतात. यापैकी बहुसंख्य मतदार आहेतच. आताच्या राजकीय गदारोळात हे सर्वच मराठी मतदार सुप्त आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जो राजकीय कलगीतुरा सुरू आहे. तो सर्व ते जवळून पाहताहेत. सध्या तरी परिस्थिती कोणा एका पक्षाच्या बाजूने आहे हे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे हा सुप्त मतदार मतदानादिवशी काय भूमिका घेतो. तो कोणाच्या पाठिशी उभा राहतो, यावरही इथल्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल, एवढं नक्की!

– विश्वनाथ गरुड
wishwanath.garud@loksatta.com