सोशल मीडियावरील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्धच्या (अभाविप) मोहिमेत सहभागी झालेल्या गुरमेहर कौर हिच्या पाठिंब्यासाठी आता ‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता उमर खालिद पुढे सरसावला आहे. गुरमेहरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केल्यानंतर तिला सातत्याने धमक्या मिळत होत्या. क्रिकेटपटू, कलाकार या सर्वांनी तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याचे ट्विट सर्वाधिक गाजले होते. या ट्विटनंतर सेहवाग वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. मात्र, आपण केलेल्या ट्विटचा गुरमेहर कौर प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण सेहवागने दिले होते. या पार्श्वभूमीवर उमर खालिद याने विरेंद्र सेहवागला सणसणीत टोला हाणला आहे. सेहवाग हा बीसीसीआयसाठी खेळला, तो भारताचा प्रतिनिधी नाही, असे उमर खालिदने फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. याउलट, आज दिल्ली विद्यापीठात जमलेले हजारो विद्यार्थी आणि शिक्षक हे भारताचे प्रतिनिधित्व करतात. समानता, न्याय आणि स्वातंत्र्यावर आधारित नव्या भारताचे आम्ही प्रतिनिधी आहोत, असे खालिदने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता विरेंद्र सेहवाग उमर खालिदच्या या शाब्दिक यॉर्करला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दिल्ली विद्यापीठात शिकणारी गुरमेहर कौर ही कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन मनदीप सिंग यांची कन्या आहे. रामजस महाविद्यालयातील हिंसेनंतर गुरमेहरने सोशल मीडियावर अभाविपचा निषेध करणारी पोस्ट टाकली होती. तिच्या या पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. तिला काहीजणांकडून बलात्कार करू अशा धमक्याही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरमेहर सोशल मीडियावर सातत्याने आपली भूमिका मांडत होती. यावेळी तिने राष्ट्रवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी माझ्या वडिलांचा मृत्यू पाकिस्तानमुळे नाही, तर युद्धात झाला, अशी भूमिका केली होती. यावरून विरेंद्र सेहवागने तिच्या भूमिकेची खिल्ली उडवणारे ट्विट केले होते. मीदेखील दोन त्रिशतके केलेली नाहीत, ती तर माझ्या बॅटने केली आहेत, असा उपरोधिक टोला सेहवागने लगावला होता. त्यावरून काहींनी सेहवागला सुनावले होते तर काहीजणांनी त्याचे समर्थन केले होते. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीदेखील गुरमेहरची पाठराखण केली होती.