“भाजपाचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. जाती जातीच्या भिंती घालत आहेत. आपण २१ व्या शतकात जात आहोत आणि तुम्ही हनुमानाची जात काढता आहात. दुसरीकडे गोत्र काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम भाजप सरकार करत आहेत,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सातारा रहिमतपूरच्या जाहीर सभेत केला.

पवार म्हणाले की निवडणूका आल्या की यांना राममंदिराचा मुद्दा आठवतो. चार वर्षे झोपला होतात का असा संतप्त सवाल करतानाच आम्ही जातीच्या नावावर कधी निवडणूका जिंकल्या नाहीत तर विकासाच्या मुद्यावर जिंकल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शेतकरी संकटात सापडला आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकत नाही. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देत नाही असे सांगत पवारांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. आज जी दयनीय अवस्था देशातील जनतेची झाली आहे याला देशात सुरु असलेली हुकुमशाही पद्धत असल्याचे सांगतानाच भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची झालेली अवस्था काय झाली आहे हेही बघा असे पवार म्हणाले.

“पवारसाहेबांना देशाच्या राजकारणात जिवाभावाची माणसं भेटली म्हणून ते राजकारणाच्या पटलावर ५० वर्षे टिकून राहिले आहेत. देशाच्या राजकारणात पवारसाहेबांचे स्थान मोठं आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत खासदारांच्या रुपाने ताकद द्यायची आहे त्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून द्या,” असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

यावेळी त्यांनी फडणवीसांवरही टीका केली. पवार म्हणाले, “मोदींची सवय फडणवीस यांना लागली आहे आणि फडणवीस यांची सवय त्यांच्या सर्व फलटणीला लागली आहे.” “शिवसेना आणि शेतीचा काही संबंध आलाय का कधी. यांनी साधी सोसायटी तरी काढली का. नुसतं जय भवानी जय शिवाजी बोलायचं. आम्हाला राजांचा आदर आहे. ते आपले दैवत आहेत. परंतु याचं त्यांच्यावर नावावर काय सुरु आहे,” अशी टिका करत अजित पवारांनी शिवसेनेलाही लक्ष्य केलं.