साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लष्कर आणि शहीदांबद्दल प्रचारामध्ये वक्तव्य करु नये असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते. २६/११ हल्ल्याच्यावेळी मुंबईतील जनतेसाठी लढत असताना ते शहीद झाले असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि दिग्विजय सिंह यांच्यामध्ये थेट लढत आहे. भाजपाने भोपाळमधून दिग्विजय  सिंह यांच्या विरोधात साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले.