जगप्रसिद्ध टाइम या नियतकालिकेने यंदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या एलॉन मस्क यांची यंदाच्या ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे. ही निवड झाल्यानंतर ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांची नक्की संपत्ती किती तसेच ते दरवर्षी कर म्हणून किती रक्कम भरतात यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात झालीय. नेटकऱ्यांना मस्क यांच्या संपत्तीबरोबरच त्यांच्याकडून या संपत्तीसाठी देण्यात येणाऱ्या कराच्या आकडेवारीबद्दलही बरीच उत्सुकता आहे. त्यामुळेच मस्क यांनी स्वत:च ते किती कर भरतात याची आकडेवारी ट्विटरवरुन शेअर केलीय.

नक्की वाचा >> कामादरम्यान FB पाहण्याची सवय मोडण्यासाठी नेमली कानाखाली मारणारी महिला ‘स्लॅपर’; एलॉन मस्कलाही आवडली कल्पना, म्हणाला…

मस्क यांनी किती कर भरतो यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यामागील प्रमुख कारण ठरलं अमेरिकेतील डेमोक्रॅटीक पक्षाच्या सिनेटर अलिझाबेट वॉर्नर यांनी ट्विटरवरुन केलेलं वक्तव्य. मस्क यांना ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवडण्यात आल्यानंतर वॉर्नर यांनी मस्क यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. मस्क यांनी वेळत कर भरला पाहिजे आणि इतरांवरील ओझं हलकं केलं पाहिजे असं ट्विटरवरुन म्हटलं होतं.

या टीकेवर उत्तर देताना मस्क यांनी, “आज पर्यंतच्या इतिहासात कोणत्याही अमेरिकन व्यक्तीने दिला नसेल इतकी रक्कम आपण यंदाच्या वर्षी कर म्हणून भरणार आहोत,” असं म्हटलं होतं. मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची टेस्ला कंपनीचे मूल्य एक ट्रिलीयन डॉलर्स (सुमारे ७६ लाख कोटी रुपये) इतके आहे. कंपनीचे मूल्य आता फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. मागील काही आठवड्यांमध्ये मस्क यांनी कंपनीमधील १४ बिलीयन अमेरिकन डॉलर्सचे शेअर्स विकले आहेत.

“मी किती कर भरणार याबद्दल जे लोक विचार करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की यंदाच्या वर्षी मी अकराशे कोटी डॉलर्सहून अधिक कर भरणार आहे,” असं ट्विट मस्क यांनी केलं आहे.

“एलन मस्क हे २०२१ मध्ये आपल्या समाजातील बदलाचे सर्वात मोठे उदाहरण आहेत.”असं टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थनल म्हणाले आहेत. विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मस्क यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही घर नाही. बिझनेस इनसाइडरने एका अहवालात म्हटले आहे की एलोन मस्कची सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये ४७ एकरची मालमत्ता आहे. घर विकल्यानंतर एलन मस्ककडे स्वतःचे घर राहिले नाही. सध्या एलन मस्क भाड्याने राहतात.