* ‘मन की बात’ कार्यक्रमात बराक ओबामांचे मुक्तचिंतन
देशातील युवापिढीचा शैक्षणिक विकास हीच राष्ट्राची खरी ताकद असल्याचे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मंगळवारी आकाशवाणीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले. भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. अमेरिकेतील नागरिक मोदींच्या कार्यशैलीने प्रभावित झाल्याचेही ओबामा यांनी म्हटले.
देशातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी आकाशवाणीच्या माध्यमातून सुरू केलेल्या या कार्यक्रमात यावेळी मोदींसह बराक ओबामा यांनीही भारतीयांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदी यांनी बराक या शब्दाचा अर्थ समजावून दिला. स्वाहिली भाषेत बराक या नावाचा अर्थ आशीर्वाद प्राप्त व्यक्ती असा होत असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच प्रजासत्ताक दिनी ओबामा उपस्थित असणे देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचेही ते पुढे म्हणाले. तर, ओबामा यांनी भारतीय संस्कृतीने प्रभावित माझ्या मुली प्रभावित झाल्याचे म्हटले. मायदेशी परत गेल्यावर भारत दौऱयातील आठवणी मुलींना सांगणार असल्याचेही ओबामा म्हणाले.
इबोला आणि पोलिओ विरोधात लढण्यासाठी मोदींशी चर्चा केली असल्याचेही ओबामा यांनी सांगितले. मी व्हाईट हाऊसमध्ये कधी राहिन असा विचारही केला नव्हता, मोदी आणि मी दोघेही सामान्य कुटुंबातून आलो असल्याचे ओबामा यावेळी म्हणाले.