पाप केल्याने कर्करोग होतो अशी मुक्ताफळे उधळल्यानंतर आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्यावर राजकीय स्तरातून मोठी टीका झाल्यानंतर त्यांनी आज बिनशर्त माफी मागितली. माझ्या वक्तव्याचा राजकीय फायद्यासाठी विपर्यास करण्यात आल्याचा आरोपही यावेळी शर्मा यांनी केला.

सरकारी शाळांमधील गरिब विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी दुर्लक्ष करु नये यासाठी आपण असा शब्दप्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले. माध्यामांतील आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी मिळून हा वाद घडवून आण्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

‘माझ्या वडिलांना, जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना कर्करोगामुळे मी गमावले आहे. आसाममधील प्रत्येकाला माझे कर्करोगासंबंधातील कार्य माहिती आहे. कर्करोगावर चांगल्या उपचारांसाठी आणि सुविधांसाठी, मोफत केमोथेरपी, कर्करोगावरील उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देणे, तंबाखूवर बंदी घालणे अशा कर्करोगाबाबत मी आरोग्यमंत्री असल्यामुळे कामे केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन अगदी खालच्या स्तराला जाऊन राजकीय प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडाडून टीका केली. तसेच आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर बिनशर्त माफी मागतो’ असेही त्यांनी म्हटले आहे.

‘हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पापांची शिक्षा मिळते. भूतकाळात केलेल्या चुकांची शिक्षा लोकांना मिळत असते,’ अशा शब्दांमध्ये विश्व शर्मा यांनी कर्करोग का होतो, याचे कारण सांगितले. ‘देव आपण केलेल्या पापांची शिक्षा देतो. तरुण मुलाला कर्करोग होतो किंवा त्याचा अपघात होतो. तुम्ही जर याची पार्श्वभूमी बघितली तर त्या व्यक्तींच्या वाईट कृत्यांमुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढावते. हा दैवी न्याय आहे,’ असे शर्मा गुवाहाटीतील एका कार्यक्रमात म्हणाले होते.