चेन्नई, : भारतात एकच सामायिक भाषेची संकल्पना प्रत्यक्षात आणणे दुर्दैवाने शक्य नाही, देशात जर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याला केवळ  दक्षिणेतीलच नव्हे तर उत्तरेतीलही अनेक राज्ये विरोध करतील, असे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त एका कार्यक्रमात असे सांगितले होते की, देशाची एकजूट राखायची असेल तर संपूर्ण देशात एकच भाषा असली पाहिजे. हिंदी ही देशाची सामायिक भाषा होऊ शकते. त्यांनी एक देश- एक भाषा असा अप्रत्यक्ष संदेश यातून दिला होता. त्यावर दाक्षिणात्य राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. द्रमुकचे अध्यक्ष एम.के स्टालिन, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व कर्नाटकचे  मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी हिंदूी भाषा लादल्यास असंतोष निर्माण होईल असा इशारा दिला आहे.

रजनीकांत यांनी सांगितले की, हिंदी भाषा देशावर लादली जाता कामा नये. कारण सामायिक भाषेची संकल्पना आपल्या देशात राबवणे दुर्दैवाने शक्य नाही. भारतच नव्हे तर कुठल्याही देशासाठी एक भाषा असणे हे एकता व प्रगतीसाठी चांगलेच आहे, पण दुर्दैवाने आपल्या देशात सामायिक भाषा शक्य नाही. त्यामुळे तुम्ही कुठली भाषा लादू शकत नाही. हिंदी भाषा लादली तर केवळ तमिळनाडूच नव्हे, तर दक्षिणेकडील कुठलेही राज्य ते स्वीकारणार नाही. उत्तर भागातील अनेक राज्येही हिंदी भाषा लादलेली सहन करणार नाहीत.

या आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री व भाजप नेते येडियुरप्पा यांनी असे म्हटले आहे,की कन्नड ही कर्नाटकची भाषा आहे व त्याचे महत्त्व कधीच कमी होऊ देणार नाही. रजनीकांत यांचे समकालीन व मक्कल नीधी मय्यमचे संस्थापक अध्यक्ष कमल हासन यांनी सांगितले की, हिंदी भाषा लादली तर जलीकट्टू समर्थनार्थ आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन तमिळनाडूत होईल. हिंदी भाषा लादण्याच्या विरोधात द्रमुकने १९६० च्या दशकात तमिळनाडूत मोठे आंदोलन केले होते.