प्रत्यक्ष समोरा-समोरची लढाई करण्याऐवजी मानसिक युद्ध लढण्यावर चीनचा जास्त विश्वास आहे. शत्रूवर मानसिक दबाव वाढवण्यासाठी चीनकडून सतत सैन्य शक्तीचा खोटा प्रचार करणारे व्हिडीओ प्रसारीत केले जातात. आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यांच्या एअर फोर्सची ताकत दाखवण्यासाठी तयार केलेला पीआर व्हिडीओ तकलादू असल्याचं समोर आलं आहे.

या व्हिडीओच्या निमित्ताने चीनची चोरी पकडली गेली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची खिल्ली उडवली जात आहे. जगातील दुसरे सर्वात मोठे लष्कर ‘ट्रान्सफॉर्मर’, ‘द रॉक’ या गाजलेल्या हॉलिवूड ब्लॉकबस्टरच्या क्लिप्स स्वत:च्या प्रचारासाठी का वापरत आहे? असा सवाल विचारला जात आहे. एएफपीने हे वृत्त दिले आहे.

विबोवर या व्हिडीओला ४० लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. यामध्ये चिनी एअर फोर्सचे H-6 बॉम्बर विमान दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये चिनी वैमानिक अमेरिकेच्या दिएगो गारसिया आणि गुआम सारख्या दिसणाऱ्या तळांवर हवाई हल्ला करताना दाखवले आहे. चीनने आपली शक्ती दाखवण्याच्या हेतूने हा व्हिडीओ प्रसारीत केला होता. पण चीनमधल्याच सोशल मीडिया युझर्सनी त्यातला खोटेपणा जगासमोर आणला.

या व्हिडीओमधील मिसाइल हल्ल्याचे दृश्य ‘ट्रान्सफॉर्मर’, ‘द रॉक’ आणि ‘हर्ट लॉकर’मधून घेतले आहे. ‘हा आपला राष्ट्रीय व्हिडीओ आहे, यात आपण स्वत:चे फोटो का वापरत नाही?’ असे एका युझरने विचारले आहे. चीनचा सध्या भारत आणि अमेरिका दोन्ही देशांबरोबर वाद सुरु आहे. दक्षिण समुद्रात अमेरिकेने चीन समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली ताकत दाखवण्यासाठी चीनने असे खोटे व्हिडीओ प्रसारीत करत आहे.