अवघ्या ४० जागा मिळालेल्या असताना त्या जोरावर नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री कसे काय होऊ शकतात? असा प्रश्न राजदचे नेते मनोजकुमार झा यांनी विचारला आहे.लोकांनी दिलेला कौल हा नितीशकुमार यांच्या विरोधात आहे. त्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बिहारची जनता लवकरच दुसरा पर्याय शोधू शकते. कदाचित आठवडाभरात, कदाचित दहा दिवसात किंवा कदाचित महिनाभरात बदल घडेल असंही झा यांनी म्हटलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी १२५ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे. तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली कडवी झुंज देणारा राष्ट्रीय जनता दल (राजद) ७५ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ ७४ जागा मिळवून भाजपाने दुसरे स्थान मिळवले आहे.

सिन्हा यांनीही केली होती टीका

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात ‘बिहार धन्यवाद’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांकडेच राहील, असे संकेत दिले. त्यानंतर “जनता मालक आहे. त्यांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानतो,” असं नितीश कुमार यांनी ट्विट केलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार मनोज सिन्हा यांनी नितीश कुमार यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. “नितीश कुमार ४० जागा जिंकून मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहेत खरंच जनता मालक आहे” असे सिन्हा म्हणाले.