अरबी नागरिकांना लग्नासाठी भारतातील अल्पवयीन मुलींची विक्री करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट आठवडाभरापूर्वी हैदराबाद पोलिसांनी उध्वस्त केले होते. या कारवाईत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले होते. यात ओमान, कतार येथील नागरिक तसेच तीन भारतीय काझींचा समावेश होता. त्यानंतर आज (मंगळवारी) पुन्हा कारवाई केली. त्यात एका भारतीय काझीसह चार अरबी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हैदराबादचे पोलीस उपायुक्त व्ही. सत्यनारायण यांनी ही माहिती  दिली.


याआधी केलेल्या कारवाईत पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. त्यात मुंबई येथील फरिद अहमद खान या काझीचाही समावेश होता. तसेच चार लॉजचे मालक आणि पाच दलालांनाही अटक केली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या अरबी शेख याने दलाल, काझी आणि लॉज मालकांच्या मदतीने येथील अल्पवयीन मुलींशी लग्न केल्याची माहिती हैदराबाद शहर पोलीस आयुक्त एम. महेंदर रेड्डी यांनी दिली होती.

या कारवाईनंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली होती. लग्नाचे हे रॅकेट हैदराबादपासून ओमान आणि इतर आखाती देशांपर्यंत पसरले आहे. या प्रकरणी गेल्या महिन्यात जुन्या हैदराबाद शहरातील फलकनुमा येथे एका महिलेने तक्रार दाखल केली होती. पतीने काही दलालांच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीला एका ७० वर्षीय ओमानी नागरिक अहमद अब्दुल्ला याला विकले होते, असे तिने तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलीची ओमान येथून सुटका करण्यासाठी आणि आरोपींना हैदराबादमध्ये आणण्यासाठी पोलीस प्रयत्नशील होते.