लडाखमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला खडसावले

नवी दिल्ली : ‘‘विस्तारवादाचे युग आता संपलेले असून विकासवादाचे युग सुरू झालेले आहे. विस्तारवादी प्रवृत्तींचा नेहमीच पराभव झाला वा त्यांना हुसकावून लावले गेले. त्याची इतिहास साक्ष देतो. शूरांकडेच शांतता प्रस्थापित करण्याची ताकद असते, कमकुवत कधीच शांततेची चर्चा सुरू करू शकत नाहीत’’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला समज दिली.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी अचानक लेह-लडाखचा दौरा केला. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या संघर्षांनंतर तिथल्या सद्य:परिस्थितीची माहिती पंतप्रधानांनी संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यासाठी त्यांनी लेहपासून ४५ किलोमीटरवर असलेल्या निमू येथील लष्करी तळाला भेट दिली. निमू हे ठिकाण प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक नसले तरी ते समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर जन्स्कार पर्वत रांगांमध्ये आहे. सिंधू नदीच्या किनारी वसलेले हे गाव पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे.  या भाषणानंतर मोदी लेहमधील लष्कराच्या रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना प्रत्युत्तर देताना जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीची चौकशी केली. लडाखच्या दौऱ्यात मोदींबरोबर संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हेही होते. जूनमध्ये चीनशी झालेल्या संघर्षांनंतर पहिल्यांदाच लडाखमध्ये संरक्षण दलांच्या सुसज्जतेचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च शासकीय नेतृत्वाने भेट दिली.

१५-१६ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याचा संदर्भ घेत, जवानांसमोर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, ‘‘जितक्या उंचीवर तुम्ही (जवान) तैनात आहात, त्यापेक्षाही सर्वोच्च तुमचा पराक्रम आहे. देशाची सुरक्षा तुमच्या हातात असते तेव्हा देश सुरक्षित असल्याची खात्री पटते. फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण देशाचा तुमच्या साहसावर विश्वास आहे, म्हणूनच त्यांना कधी सुरक्षेची काळजी वाटत नाही. अहोरात्र तुम्ही प्रत्येक देशवासीयाला प्रेरणा देत असता. आत्मनिर्भर भारत बनवण्याचे आपले लक्ष्य अधिकाधिक मजबूत होत आहे ते निव्वळ तुमच्याच ध्येयवादावर. तुम्ही दाखवलेली जिद्द-साहस प्रत्येक भारतीयाला जगात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते.’’

भारताच्या शत्रूंनी तुमच्यातील प्रखर ऊर्जा पाहिली आहे आणि त्याचा प्रहारही झेलला आहे. तुमची इच्छाशक्ती हिमालयासारखीच कणखर आणि भक्कम आहे, असे मोदी म्हणाले.

संरक्षणमंत्री गैरहजर

लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढत असून लष्करी स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चाही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लडाख दौऱ्यावर जाणार होते. त्यासंदर्भात गुरुवारी संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलांतील प्रमुखांशी राजनाथ यांची बैठकही झाली होती. मात्र, संरक्षण मंत्र्यांऐवजी पंतप्रधान मोदी यांनीच लडाखचा दौरा केला. चीनलाच नव्हे तर जागतिक स्तरावरही राजनैतिक संदेश देण्यासाठी मोदी यांची लडाख भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, या दौऱ्यात संरक्षणमंत्र्यांचा समावेश केला गेला नाही. आता पुढील आठवडय़ात राजनाथ सिंह लडाखला भेट देणार आहेत.

फौजफाटय़ात वाढ.. गलवान खोऱ्यातच नव्हे तर पेंगाँग त्सो, हॉट स्प्रिंग, व्होरा गस्तीतळ अशा पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर विविध ठिकाणी भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढलेला आहे. या भागांमध्ये मोठय़ा संख्येने चिनी सैनिकांची उपस्थिती आहे. त्यामुळे भारतानेही फौजफाटय़ात वाढ केली आहे.

उल्लेख न करता..

निमू येथील तळावर  लष्कर, हवाई दल आणि इंडो-तिबेट सीमा सुरक्षा पोलिसांसमोर केलेल्या भाषणात मोदी यांनी संरक्षण दलाच्या जवानांच्या शौर्याचे कौतुक केले. त्यांनी भाषणात चीनला सज्जड इशारा दिला, मात्र संपूर्ण भाषणात एकदाही चीनचा उल्लेख केला नाही.

लडाख हे देशाचे शिर आहे, १३० कोटी देशवासीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. देशासाठी त्याग करणाऱ्या लोकांची ही भूमी आहे. लडाखला तोडण्याचा प्रत्येक प्रयत्न इथल्या राष्ट्रवादी जनतेने हाणून पाडला आहे. बासरी वाजवणाऱ्या कृष्णाला नमन करणारे आपण त्याच्या सुदर्शन चक्राचेही महत्त्व जाणतो. 

       –  पंतप्रधान नरेंद्र मोदी