मध्य प्रदेशच्या एका कॅबिनेट मंत्र्याने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना गौ मंत्रालय (गाय) सुरू करण्याची मागणी केली आहे. कॅबिनेट मंत्री अखिलेश्वरानंद यांनी मुख्यमंत्र्यांकडे गाय मंत्रालयाची स्थापना करण्याचे अपील केले आहे. राजस्थानमध्ये जर गाय सचिवालय असू शकते तर मध्य प्रदेशमध्ये गाय मंत्रालय का नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे. जनावरांच्या (पशुधन) श्रेणीतून गायीला बाहेर काढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

स्वामी अखिलेश्वरानंद गिरी म्हणाले की, मी मध्य प्रदेश सरकारला गौ मंत्रालय स्थापन करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री स्वत: शेतकरी आहेत. माझ्यासारखे लोक त्यांना मदत करतील. यासाठी जनतेचेही समर्थन मिळत असल्याचे ते म्हणाले. नवीन मंत्रालय स्थापन केल्यास गायींना चांगले संरक्षण मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

स्वामी अखिलेश्वरानंद हे नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी तिसरे महायुद्ध हे गायीवरून होईल असे म्हटले होते. त्याचबरोबर १८५७ मधील क्रांतीचे कारण गायच होती, असा दावा ही त्यांनी केला होता. मृत गाय पाहिल्यानंतर कोणालाही राग येणे स्वाभाविक आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे वक्तव्य त्यांनी गौ रक्षकांच्या समर्थनात केले होते.

कोण आहेत स्वामी अखिलेश्वरानंद
स्वामी अखिलेश्वरानंद यांना २०१० मध्ये निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले होते. सन्यास घेतल्यानंतर १२ वर्षांनी त्यांना ही उपाधी देण्यात आली होती. सन्यास घेण्यापूर्वी ते विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी अभियानात सक्रीय होते. अखिलेश्वरानंद हे मध्य प्रदेशचे गौ पालन आणि पशुधन संवर्धन मंडळाचे अध्यक्षही आहेत. नुकताच त्यांना शिवराज सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. पूर्वी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला होता. आता त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.