अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी भारत अमेरिकेचा महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचं म्हटलं आहे. तसंच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याबरोर चीन सीमेवरील चकमकीसोबतच अन्य मुद्द्यांवरदेखील सतत चर्चा होत असल्याचंही ते म्हणाले.

“भारत अमेरिकेचा महत्त्वूर्ण भागीदार आणि साथीदारही आहे. माझ्या समकक्ष असलेल्या एस जयशंकर यांच्याशीही माझे उत्तम संबंध आहेत. निरनिराळ्या मुद्द्यांवर कायमच आमची चर्चा सुरू असते. चीन सोबत झालेल्या चकमकीबाबतही आमची काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. चीनच्या दूरसंचार कंपन्यांबाबतही आमच्यात चर्चा झाली,” असंही पॉम्पिओ म्हणाले. भारतानं चीनच्या अॅपवर घातलेल्या बंदीबाबतही यावेळी भाष्य केलं.

चीनवर हेरगिरीचे आरोप

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी मंगळवारी फॉक्स न्यूज रेडिओला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी चीनवर हेरगिरी करत असल्याचे आरोप केले. “भारतानं टिक-टॉक सारख्या मोबाईल अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनच्या हेरगिरीच्या कामातून एक मोठं टूल बाजूला गेलं आहे. ट्रम्प् प्रशासनही टिक-टॉक, व्हीचॅट आणि अन्य अॅपची अतिशय गंभीरतेनं तपासणी करत आहे,” असंही ते म्हणाले होते. “भारतानं अशा अॅप्सवर यापूर्वी निर्बंध लादले आहेत. जर भारत, अमेरिका आणि युरोपियन देशांना जर त्यांनी गमावलं तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या हेरगिरीच्या कामाचं महत्त्वाचं साहित्य दूर होईल,” असंही ते म्हणाले.