भारताने पुन्हा परवाना राजकडे न वळता उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी धोरणे तयार करावीत, असे मत नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल क्रुगमन यांनी व्यक्त केले आहे.

अशोका विद्यापीठाने आयोजित केलेल्या आभासी दूरसंवाद कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, उत्पन्नातील असमानता हा भारतातील सर्वांत गंभीर प्रश्न आहे. परवाना राजकडे चुकूनही परत जाऊ नका. भारतासारख्या देशाने उलट उद्योगांना अनुकूल धोरण तयार करावे. परवाना राजमध्ये अनेक गोष्टींसाठी परवाने तर असतात व नियम निर्बंधांची जंत्रीच असते. त्यांची पूर्तता केल्यानंतरच उद्योग सुरू करता येतात. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण अवलंबताना परवाना राज संपुष्टात आणले.

भारत ज्यात जास्त कामगार लागतात, अशा उद्योगांत आघाडीवर का नाही, या प्रश्नावर क्रुगमन यांनी सांगितले की, इतर देशांमध्ये काही वस्तूंच्या उत्पादनासाठी जास्त कामगार लागतात व त्यासाठी अनुकूल स्थिती असते, पण भारतातील परिस्थिती त्याला अनुकूल नाही. भारताची अंतर्गत भौगौलिक रचना हे त्याचे एक कारण आहे. भारतात उद्योगेतर परिसंस्था कुठल्याच प्रकारे नाही. भारतात वाहतुकीच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर नाहीत. त्यातूनही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यामुळे उत्पादन व कामगारकेंद्री व्यवस्थेकडे जाता येत नाही. जास्त कामगारांची आवश्यकता असलेल्या उद्योग प्रवर्गात भारताची कामगिरी फारशी चांगली नाही. पण सेवा क्षेत्र व उच्च कौशल्य उत्पादनात भारताची कामगिरी चांगली आहे. सेवा क्षेत्रातून सर्वांत जास्त देशांतर्गत उत्पन्न मिळते. पण त्यातून जास्त नोक ऱ्या किंवा रोजगार निर्माण होत नाहीत.

क्रुगमन यांना २००८ मध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता.

भारताबाबत चिंता का?

क्रुगमन म्हणाले, की जरी जागतिकीकरणाचा वेग कमी झाला असला, तरी  विकसनशील देशांच्या निर्यातभिमुख विकासाबाबत आपण आशावादी आहोत. भारतात उत्पन्नाची असमानता हा खरा प्रश्न आहे. जर अमेरिकेत पाहाल तर असमानता वाढलेली आहे. त्याचा मुकाबला करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे भारतातही काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे यात शंका नाही.