रक्त गोठवणाऱ्या थंडीपासून बचाव करणारे तंबू भारतीय लष्करासाठी खरेदी केले जाणार आहेत. या तंबूंमुळे जवानांचा अतिथंडीपासून बचाव होण्यास मदत होणार आहे. यासंबंधीची तातडीची ऑर्डर लष्कराने दिली आहे. लष्कराने याबाबतचा निर्णय घेतल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. एवढंच नाही नाही तर ३० हजार अतिरिक्त सैन्य दल लडाखमध्ये पाठवण्यात आलं आहे. चीनने काही आगळीक केली किंवा कुरापत केलीच तर त्यासाठीच ही व्यवस्था करण्यात आल्याचं लष्कराने म्हटलं आहे.

गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात जून महिन्यात चकमक झाली होती. त्यानंतर भारतात चीनविरोधातला रोष काय आहे. दुसरीकडे रक्त गोठवणारी थंडी असल्याने आमच्या पोशाखांची आणि राहण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने करण्यात यावी अशी मागणी गेल्याच आठवड्यात या लेह, लडाखच्या लष्करी जवानांनी केली होती. या सगळ्या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर जवानांचं रक्त गोठवणाऱ्या थंडीपासून रक्षण करणारे तंबू खरेदी करण्याचा तातडीचा निर्णय लष्कराने घेतला आहे.

कदाचित चीनसोबतचा संघर्ष हा पुढचे काही महिने म्हणजे अगदी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सुरु राहू शकेल अशीही शक्यता आहे. सध्याच्या काळात जवानांना रक्त गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागतो आहे. यापासून बचाव व्हावा म्हणून तातडीने थंडीपासून बचाव करणारे तंबू खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. एवढंच नाही तर LAC म्हणजे लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलजवळ शस्त्रसाठाही वाढवण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. शनिवारीच भारत चीन सीमेजवळ असलेल्या वायुदलाच्या तळावर घातक अपाचे, मिग २९ यांनीही कसून सराव केला. आम्ही गगनभेदी कामगिरी करण्यासाठी एकदम सज्ज आहोत असंही भारतीय वायुदलाने स्पष्ट केलं आहे.