भारतीय लष्कराला अखेर नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बुलेटप्रूफ जॅकेट मिळणार आहेत. केंद्र सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत ६३९ कोटींचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला १.८६ लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत. लष्कर गेल्या नऊ वर्षांपासून कारवाईदरम्यान बुलेटप्रूफ जॅकेट मिळावेत यासाठी प्रयत्न करत होतं. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी करारावर सही केली असून यशस्वी ट्रायलनंतरच कराराला अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे.

दिल्लीमधील एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेज या कंपनीला हा करार मिळाला आहे. हा आतापर्यंत त्यांना मिळालेला सर्वात मोठा करार आहे. तीन वर्षांमध्ये हे जॅकेट्स डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयाने 1,86,138 बुलेटप्रूफ जॅकेट्ससाठी करारावर सही केल्याची माहिती दिली आहे. तसंच हे बुलेटप्रूफ जॅकेट जवानांना ‘३६० डिग्री सुरक्षा’ पुरवतील असा दावाही करण्यात आला आहे. या जॅकेटमध्ये सुरक्षेसंबंधी सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवल्या जातील असं एसएमपीपी कंपनीने म्हटलं आहे.

दरम्यान हे जॅकेट तयार करण्यासाठी ‘बोरॉन कार्बाइड सेरैमिक’ चा वापर करण्यात येणार आहे. बॅलेस्टिक सुरक्षेसाठी हे सर्वात हलकं मटेरिअल आहे. यामुळे जॅकेटचं वजन कमी होण्यास मदत मिळेल.

बुलेटप्रूफ जॅकेट्समुळे जवानांचा आत्मविश्वास वाढेल असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, हे जॅकेट्स सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला अजून मजबूत करतील, तसंच आपण सुरक्षेशी संबंधित गरजू गोष्टींची निर्मिती करु शकतो हा आत्मविश्वास भारतीय उद्योग क्षेत्रात निर्माण करेल.

भारतीय लष्कराने केलेली बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केंद्र सरकारने २००९ मध्येही मान्य केली होती. मात्र त्यावेळी लष्कराने आयोजित केलेल्या ट्रायलमध्ये एकही कंपनी टिकू शकली नव्हती. सामील झालेल्या चारपैकी फक्त एका कंपनीने पहिला राऊंड पार केला होता..