तस्करी विरोधी ऑपरेशनमध्ये भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी गुजरातच्या जाखाऊ किनाऱ्याजवळ अमलीपदार्थाने भरलेली एक पाकिस्तानी बोट पकडली. ‘अल मदीना’ असे या बोटीचे नाव आहे. या बोटीमध्ये अमलीपदार्थांची १९४ पाकिटे सापडली असून त्याची किंमत ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे.

हे अमलीपदार्थ जाखाऊच्या किनाऱ्यावर पोहोचवण्यासाठी पाकिस्तानी बोट आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेजवळ थांबली होती. ही बोट पकडण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने एक जहाज आणि दोन वेगवान इंटरसेप्टर बोटी पाठवल्या. गुप्तचरांच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. समुद्र खवळलेला असतानाही तटरक्षक दलाच्या बोटींनी पाठलाग करुन पाकिस्तानी बोट पकडली.

यावेळी अल मदीनावरुन काही संशयास्पद बॅगा समुद्रात टाकण्यात आल्या. तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोटीवरील सदस्यांना ताब्यात घेतले व पाण्यातून सात बॅगा बाहेर काढल्या. अमली पदार्थ शोधणाऱ्या किटच्या मदतीने पॅकेटच्या तपासणीमध्ये त्यात अमलीपदार्थ आढळून आले. बाजारपेठेत ४०० ते ५०० कोटी रुपये या अमलीपदार्थाची किंमत आहे.