जगभरात सध्या करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी संयुक्त राष्ट्राच्या महासभेचं आयोजन व्हर्च्युअल पद्धतीनं करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संबोधित केलं. ज्यावेळी इम्रान खान यांनी संबोधित करण्यास सुरूवात केली त्यावेळी संयुक्त राष्ट्राच्या असेंबली हॉलमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय प्रतिनिधींनी वॉकआउट केलं. यादरम्यान इम्रान खान यांनी भारतावर आरोपही केले.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात इम्रान खान यांनीदेखील संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतावर अनेक आरोप केले. यावेळी त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यानंतर काश्मीरच्या मुद्द्यावर भारतावर आरोप केले. पाकिस्तान आणि पाकिस्तानची जनता आपल्या काश्मिरी बंधू भगिनींनी सुरू केलेल्या संघर्षाचं समर्थन करते आणि त्यांच्यासोबत राहण्यास कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान सरकारद्वारे कोणत्याही हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाचं खंडन करत त्यांनी याचा खोटा प्रचार सुरू असल्याचंही म्हटलं.

आणखी वाचा- आरोप करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावलं; POK वरील अवैध ताबा सोडा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गांधी आणि नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना मागे टाकून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही इ्म्रान खान यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. यापूर्वी संयुक्त राष्ट् संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद करैशी यांनी काश्मीरच्या मुद्द्याचा उल्लेख केला होता. त्यावर भारताच्या संयुक्त राष्ट्रातील परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विदिशा मित्रा यांनी कठोर शब्दात पाकिस्तानला सुनावलं होतं. “आज जे आपण ऐकलं ते चे भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर पाकिस्तानच्या प्रतिनिधींद्वारे कधीही न संपणाऱ्या काल्पनिक गोष्टी आहेत. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. संयुक्त राष्ट्रात जर कोणत्या गोष्टीची चर्चा झाली तर ती दहशतवादाचा सामना कसा करायला हवा यावर झाली पाहिजे. संयुक्त राष्ट्राचा हा अजेंडा अद्याप पूर्ण झाला नाही,” असं विदिशा मैत्रा म्हणाल्या होत्या.