संयुक्त राष्ट् संघाच्या ७५ व्या सत्रात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या संबोधनादरम्यान पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा मुद्दा उचलला. त्यांच्या अनेक खोट्या आरोपांमुळे भारतानं त्यांच्या संबोधनादरम्यान वॉकऑउटही केलं होतं. दरम्यान, शनिवारी इम्रान खान यांच्या आरोपांचं खंडन करत पुन्हा एकदा भारतानं जम्मू काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचं पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सांगितलं. तसंच पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्ताननं अवैधरित्या मिळवलेला ताबाही सोडण्यास सांगितलं. ‘राईट टू आन्सर’चा नापर करत शनिवारी भारतीय मिशनचे पहिले सेक्रेटरी मिजितो विनितो यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत उत्तर देत आता केवळ काश्मीरवर पाकव्याप्त काश्मीरचीच चर्चा शिल्लक असल्याचे ते म्हणाले.

“जे लोकं द्वेष आणि हिंसा पसरवण्याचं काम करतात त्यांना बेकायदेशीर म्हणून घोषित केलं पाहिजे असं पाकिस्तानचे नेते म्हणाले. जेव्हा त्यांनी असं म्हटलं त्यावेळी आम्हाला आश्चर्य वाटलं. ते स्वत:चाच उल्लेख करत होते का?,” असा सवाल मिजितो यांनी इम्रान खान यांच्या भाषणावर उत्तर देताना केला. “या हॉलनं आज अशा व्यक्तीला ऐकलं आहे ज्यांच्याकडे स्वत:कडून दाखवण्यासारखं काहीही नाही. त्यांच्याकडे अशी कोणतीही कामगिरी ज्यावर ते बोलू शकतील. जगालाही देण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही सूचना नाहीत,” अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला उत्तर दिलं.

पाकिस्ताननं असेंबलीच्या माध्यमातूनच खोटी माहिती, युद्धाची धमकी आणि द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे. हा तोच देश आहे जो दहशतवाद्यांना देशाच्या तिजोरीतून पेंशन देतो. आज आपण ज्यांना ऐकलं हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी जुलै महिन्यात आपल्या संसदेतील एका चर्चेदरम्यान ओसामा बिन लादेन याला शहीद म्हटलं होतं. हे तेच नेते आहेत ज्यांनी २०१९ मध्ये सार्वजनिकरित्या आपल्या देशात ३०-४० हजार दहशतवादी असल्याची कबुलीही दिली होती. तसंच त्यांना पाकिस्तानद्वारे प्रशिक्षण दिलं जात असून अफगाणिस्तान आणि भारतातही पाठवण्यात येत असल्याचं कबुल केल्याचं मिजितो म्हणाले.

आणखी वाचा- UN मध्ये भाषणादरम्यान इम्रान खान यांचे आरोप; भारतानं केलं बॉयकॉट

काश्मीरबाबतही उत्तर

काश्मीरवरील इम्रान खान यांच्या प्रश्नावरही त्यांनी कठोर शब्दात उत्तर दिलं. “काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरबाबत आता कोणताही वाद शिल्लक असेल तर तो आता केवळ पाकव्याप्त काश्मीरचा आहे. पाकिस्ताननं अवैधरित्या ताबा मिळवलेला पाकव्याप्त काश्मीर त्यांनी रिकामा करावा,” असंही ते म्हणाले.

इम्रान खान यांचे खोटे आरोप

यापूर्वी आपल्या संबोधनादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय लष्करावर खोटे आरोप केले. त्यावेळी भारतीय प्रतिनिधींनी वॉकआउट केलं. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गांधी आणि नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना मागे सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे,” असं ते म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी २००२ च्या गुजरात दंगलीचा उल्लेख करत भारतातील मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचंही म्हटलं. “भारतानं काश्मीवर अवैधरित्या ताबा मिळवला आहे. त्या ठिकाणी मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे. संयुक्त राष्ट्रानं यावर तोडगा काढला पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं. तसंच कलम ३७० रद्द झाल्यामुळे काश्मिरी लोकांचे अधिकार संपल्याचा आरोपही त्यांनी केला.