सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी सोशल नेटवर्कींगवरुन भारतीय तरुणांना एक सल्ला दिला आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल पालकांना सरळ सांगून टाका. अगदी त्यामुळे तुमचं त्यांच्याबरोबरच नातं तुटणार असेल तरी तुमच्या प्रेमाबद्दल त्यांना सांगा असं काटजू यांनी म्हटलं आहे. फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी भारतीय पालकांच्या विचारसरणीवर टिका केली आहे.
विद्रोहाचा अधिकार या कॅप्शनसहीत काटजू यांनी एक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी एका मुस्लिम मुलीबरोबर फोनवर झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात, ‘काही वेळापूर्वी वयाच्या विशीत असणारी एक मुस्लिम तरुणी माझ्याशी फोनवर बोलत होती. तिचं लग्न झालेलं नाही. ती एका हिंदू मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तिला तो मुलगा खूप आवडतो. मात्र याबद्दल ती आपल्या पालकांना सांगू शकत नाही कारण ते जुन्या विचारसरणीचे आहेत. मी त्या मुलीला २०व्या शतकामध्ये एका बड्या नेत्याने विद्रोह करणे हा अधिकार असल्याचे सांगितले. अनेक भारतीय पालकांच्या डोक्यात जातीवाद आणि सांप्रदायिकतेच्या रुपातील शेण भरलेलं असतं. त्यामुळेच एक समजदार तरुण म्हणून तू त्यांना सरळ जाऊन ‘हे माझं आयुष्य आहे तुमचं नाही,’ असं सांगायला हवं, असा सल्ला मी तिला दिला. अगदी त्यामुळे तुझं त्यांच्याबरोबरच नातं तुटणार असेल तरी तू हे सांगितलचं पाहिजे. भारतीय तरुणांनो तुमच्या पालकांच्या विचारसरणीला विरोध करा कारण अनेक पालकांच्या डोक्यात शेण भरलेलं आहे.
It is right to rebel pic.twitter.com/J1MAVdCvPk
— Markandey Katju (@mkatju) March 22, 2019
काटजू यांच्या अनेक फॉलोअर्सने त्यांच्या या मताशी सहमती दर्शवली असून काहींनी हे मत न पटल्याचे कमेन्टमध्ये म्हटले आहे. त्या मुलीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही अनेकांनी या पोस्टखालील कमेन्ट सेक्शनमध्ये व्यक्त केली आहे.